ठाणे : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे. या संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. केंद्र सरकारकडूनही भरीव मदत मिळेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचवेळी नवरात्रोत्सव मंडळांनीही उत्सवातील काही बचत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा रविवारी पार पडला. या आगमन मिरवणुकीत एकनाथ शिंदे उपस्थित होते. मिरवणुकीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळग्रस्त भागात केंद्राचे पथक पाहणी करून गेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची आढावा बैठक पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता त्यांनीही महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. केंद्र सरकारही मोठ्या प्रमाणात सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पूर्ण करण्यात आली असून सवलती आणि नुकसान भरपाईसह संकटग्रस्त कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मुलींचे ठरलेले विवाह हा देखील गंभीर विषय असून सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी शिवसेनेकडून उचलली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मंडळाने यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाणार आहे. इतर मंडळांनीही अशाच प्रकारे काही बचत करून बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. बळीराजाची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले.
देवीची आगमन मिरवणूक कळवा येथून ठाण्यातील टेंभीनाका अशी होती. मिरवणुकी दरम्यान काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले.
