ठाणे: ठाण्यात गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील सार्वजनिक व्यवस्थेचे पितळ पुर्णपणे उघडे पडल्यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होताच महापालिकेने यापैकी काही अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कारवाईची सत्र सुरू केल्याचे दिसले. गेल्या आठ दिवसांत ठाणे महापालिका क्षेत्रात अधिक वृक्ष उन्मळून पडले. या घटनेची दखल घेत वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सहाय्यक आयुक्ताची बदली करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याला निलंबनाचा इशारा देण्यात आला.
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षात वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून बिल्डरांच्या प्रकल्पांसाठी शहरातील हजारो वृक्षतोडीचे प्रस्ताव तयार करणारे वादग्रस्त उद्यान अधिक्षक केदार पाटील यापुढे वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह पालिका अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. शहरात गेल्या आठ दिवसांत शेकडो झाडे पडली असून यात काही नागरिक जखमी झाल्याचे प्रकारही समोर आले.
वृक्ष पडझडीवरून पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून रोष व्यक्त होत असतानाच, पावसादरम्यान झालेल्या वृक्ष पडझडीची शिंदे यांनी दखल घेऊन पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ, वृक्ष प्राधिकरण आणि पाऊस-वाऱ्याशी संबंधित काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे मूल्यमापन केले जाईल. चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान केला जाईल, तर कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
यंदा जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस झाला. आतापर्यंतच्या एकूण वार्षिक पावसापैकी सुमारे ४३ टक्के, म्हणजेच ८७१ मिमी पाऊस केवळ आठ दिवसांत पडला आहे. पाऊस आवश्यक असला तरी नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन पुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आवश्यक सर्व संसाधने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी आयुक्तांना दिल्या. इतर विभागांतील अधिकाऱ्यांनाही आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले. ठाणे महापालिकेची टीडीआरएफ ही सुसज्ज आणि सक्षम यंत्रणा असून आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली सर्व तरतूद आणि नियोजन संबंधित विभागांनी तातडीने करावे, अशी सुचना आयुक्तांना करत कोणत्याही अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा अशा परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
अधिकाऱ्यांवर कारवाई
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांच्या कामात आठ दिवसांत सुधारणा झाली नाहीतर त्यांना निलंबित करण्याची नोटीस देण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांची बदली करून त्यांचा पदभार वृक्ष अधिकारी केदार पाटील यांच्याकडे देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षात वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून बिल्डरांच्या प्रकल्पांसाठी शहरातील हजारो वृक्षतोडीचे प्रस्ताव तयार करणारे वादग्रस्त उद्यान अधिक्षक केदार पाटील यापुढे वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि उद्यान अधिक्षक केदार पाटील यांच्याशी संपर्क साधला, मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
झाडांचे वैज्ञानिक पद्धतीने ऑडिट
ठाणे शहरातील झाडे अधिक मजबुतीने उभी राहावीत, यासाठी वैज्ञानिक पद्धतीने काय करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. पूर्वी झाडांच्या भोवती आळे असायचे आणि त्या आळ्यांमध्ये माती असल्यामुळे पाणी सहज मुळांपर्यंत पोहोचत असे. मात्र आता रस्त्यांचे डांबरीकरण करताना काही ठिकाणी झाडांच्या मुळांजवळील माती कमी झाली आहे किंवा तिच्या जागी इतर साहित्य भरले गेले आहे का, तसेच पाणी मुळांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचते आहे की नाही, याचे संपूर्ण झाडांचे ऑडिट करा, अशा सुचना शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या.
