ठाणे : ठाणे बदलत असून शहरामध्ये विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांसोबतच विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना चांगल्या सुविधा व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे महापालिकेच्यावतीने रविवारी ३२ व्या वर्षा मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉनला रविवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवत देशभरातून आलेल्या धावपटूंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी ते स्वतः मॅरेथॉनमध्ये धावले. यावेळी महायुतीतील आमदार, नगरसेवक तसेच ठाण्यातील कलाकारांनीही त्यांच्यासोबत धाव घेतली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे बदलत असून शहरामध्ये विकासाची कामे वेगाने सुरू असल्याचे सांगितले. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांसोबतच विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना चांगल्या सुविधा व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाणे महापालिकेने अनेक खेळाडू घडवले असून, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल शिंदे यांनी महापौर, आयुक्त आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “खेळामध्ये राजकारण आणू नये; खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळला पाहिजे,” असा संदेशही त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून देशातील युवक व खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर संधी मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली असून, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, विरोधी पक्षनेते अश्रफ शानु पठाण, नगरसेवक राजेश मोरे, संजय वाघुले, विकास रेपाळे, नम्रता जाधव भोसले, मीनल संख्ये, नारायण पवार, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुधीर कोकाटे, मुकेश मोकाशी आणि सर्व लोकप्रतिनिधी, खेळाडू, अभिनेता मंगेश देसाई आणि मराठी मालिकेतील अनेक अभिनेते – अभिनेत्री आणि ठाणेकर स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
