ठाणे : मुंबईतील वरळी येथे हिंदी भाषा सक्ती आदेश रद्द निर्णयाचा विजयी मेळावा पार पडताच एकनाथ शिंदेच्या ट्विटर अकाऊंट वर एका भावावर स्तुती सुमने, तर दुसऱ्यावर जहरी टीका केल्याचे दिसून आले. ‘एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी, ‘एकाचा मराठीचा वसा, दुसरा भरतोय खिसा’, ‘एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा’, ‘एक धाकला असून थोरला, दुसरा थोरला असून धाकला’ अशा शब्द खेळ करत एकनाथ शिंदेंना नेमके कौतुक कोणाचे आणि रोख कोणावर असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
मागील काही दिवसांपासून मराठी भाषेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करणे या दोन शासकीय आदेशाविरोधी ५ जुलै रोजी मनसे आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, त्यापुर्वी महायुतीने हे दोन्ही आदेश रद्द केल्याने, सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी दोन्ही पक्षांच्यावतीन शनिवारी विजयी मेळावा पार पडला.
या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एका मंचावर आल्याचे दिसून आले. मुंबईतील वरळी येथील एन. एस. सी. आय. डोम येथे हिंदी भाषा सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा पार पडला. यासाठी, शनिवारी सकाळपासून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते सर्वत्र जल्लोष करीत होते. या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे मनोमिलन झाल्याचे चित्र होते. हा मेळावा पार पडताच एकनाथ शिंदेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक काव्य प्रसारित करण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे बंधूपैकी एकाचे कौतुक तर दुसऱ्यावर खणखणीत टिका केली आहे.
ट्विटर अकाऊंटवरील काव्य नेमके काय ?
या काव्यात ‘एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक’, ‘एक उजवा, दुसरा डावा’, ‘एक धाकला असून थोरला, दुसरा थोरला असून धाकला’, ‘एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी’, ‘एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड !’, ‘एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता’, ‘एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा’, ‘एकाचा मराठीचा वसा, दुसरा भरतोय खिसा’, ‘एकाचा स्वतंत्र सवतासुभा, दुसरा नुसताच आयतोबा’ असे शब्द खेळ करत कौतुकासहित खणखणीत टिका केल्याचे दिसून आले.