ठाणे : लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली. आता २९ महापालिकांमध्ये विजय मिळवून विकास जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. यामुळेच या सर्वच पालिकांमध्ये महायुती करण्याचा निर्णय घेतला असून येथे महायुयीचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. महायुतीतील जागावाटपाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, महायुतीत आपला सन्मान राखला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाण्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, सुपारी फुटली आहे, लगीन घाई सुरू झाली आहे. तीन वर्षांनंतर होत असलेल्या ठाण्यातील निवडणुकीत शिवसेनेचे खणखणीत नाणे असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा भगवा इथे कोणीही उतरवू शकत नाही आणि उतरवू शकणारही नाही, असेही ते म्हणाले. विधानसभेत ८० जागा लढवून ६० जागा जिंकण्याचा चमत्कार आपण करून दाखवला. धनुष्यबाण आपल्याकडे आहे. लोकसभा आणि विधानसभेत विरोधकांचा टांगा पलटी झाला, आता महापालिका निवडणुकीतही त्यांना पाणी पाजू, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावला. आगामी जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा दणदणीत फडकणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्ते हीच खरी ताकद

कार्यकर्ते हेच माझे टॉनिक आहेत. तेच माझी ऊर्जा आणि प्रेरणा आहेत, असे सांगत शिंदे यांनी नागपूर दौऱ्याचा अनुभव सांगितला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक भेटल्यावर आपली तब्येतही सुधारते, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. नेते येतात-जातात, पदे येतात-जातात; पण कार्यकर्ता हा पक्षाचा खरा पाया आहे, असे ते म्हणाले.

विकासकामांचा पाढा

मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही ठाणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेताना शिंदे यांनी समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, सिटी पार्क, मोठे पायाभूत प्रकल्प यांचा उल्लेख केला. ठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच इतिहासजमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचाच

महापालिका निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात कार्यक्रम राबवून संघटनात्मक ताकद दाखवण्याचा निर्धार करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार करूया. ठाणे महापालिकेवर पुन्हा महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचाच आहे. प्रकल्प केले, योजना राबवल्या आणि त्याचे खणखणीत नाणे जनतेसमोर वाजले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ठाण्यात पुन्हा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.