कळवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुचर्चित खारेगाव रेल्वे उड्डाण पुलाचं आज उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात एकाच मंचावरुन महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांची एकमेकांच्या पक्षाबद्दल राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्या वादाचे फटकेबाजीतील रुपांतर आज पाहायला मिळाले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “२००९ साली आमदार झालो. मात्र, विकास कामांसाठी कडगी निधी मागण्याची आवश्यकता भासली नाही. २००९ नंतर कळवा आणि मुंब्रा यांच्यात झालेले विकास कामे यातील  फरक दिसून येईल. भास्कर नगर मधील रस्त्यासाठी विधानसभेत मांडल्यानंतर नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी त्या रस्त्याला स्थगिती देत येणार नसल्याचे सांगितले. २० वर्षानंतर हा रस्ता झाला. महापौरांनी मिशन कळवा, असे संबोधले मात्र, त्यांचे मिशन कळवा काय हे समजलं नाही. जयवंत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करतील अशी सूचना केल्यानंतर हालचाली सुरू झाल्या होत्या. महापौर नरेश म्हस्के तुम्ही चाणक्य आहात, नारदमुनी होऊ नका,” असा टोला आव्हाड यांनी लगावला.

राजकारणा पलीकडची मैत्री…

एकनाथ शिंदे आणि आमची मैत्री राजकारण पलीकडची आहे, त्यात एक अबोलपणा आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे तुम्ही कधी याबाबत विचारा, असं आव्हाड म्हणाले. तसेच एकत्रित येऊन काम करूया, असंही त्यांनी सांगितलं.

निवडणुकीत महाविकासआघाडी होणार हे पहिल्या दिवसापासून बोलतोय, मी कधीही वागळे मिशन बद्दल बोललो नाही. आपला शत्रू कोण आहे, याचा विचार करून आपण एकत्र येऊया. ठाण्यात रस्त्यांवर खड्डे दिसतील पण, कळव्यात खड्डे दिसणार नाहीत. तुम्ही निधी देता पण, कामावरही लक्ष ठेवावे लागते, असंही आव्हाड म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे…

“आमची मैत्री आहे हे खरे आहे, हे सर्वांसमोर खुले आहे. पोटात एक आणि ओटात एक असे आम्ही कधीच वागत नाही. निवडणुकांमध्ये आम्ही दोघे पक्षाचे काम करतो पण निवडणूक संपल्यानंतर कोणतीही अडी ठेवत नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकत्र येऊन जनतेची कामे करूया…

“वागळे मिशन करायला कधी रोखणार नाही. कळवा मिशन म्हणजे महाविकास आघाडीचे जास्त नगरसेवक निवडून आणणे आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित जनतेची कामे करूया. पालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी कमिशनचे राजकारण केले नाही. तसेच आयुक्तांना कधी फोन करून सांगितले नाही की ही माझी फाईल आहे. वेळप्रसंगी आम्ही एकमेकांना नडलो पण कमरेखाली वार केले नाही. ते आमच्या रक्तात नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde vs jitendra awhad verbal fight during inauguration of kharegaon bridge tlsp0122 hrc
First published on: 15-01-2022 at 17:03 IST