Eknath Shindes Reaction on Delhi Blast : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने देश हादरला आहे. मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर सोमवारी सायंकाळी झालेल्या या स्फोटात ८ जणांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटानंतर जवळच्या काही वाहनांना आग लागल्याने घटनास्थळी भीषण दृश्य निर्माण झाले होते. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर हा स्फोट झाला असून, या घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोट होताच दिल्ली पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना जवळच्या एलएनजेपी आणि एआयआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सुरक्षादलांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक तपासात कारमध्ये झालेल्या विस्फोटक स्फोटाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशभरातून घटनेचा निषेध
या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा देशाच्या राजधानीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक्स (ट्विटर) वरून आपली भावना व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं?
दिल्लीत सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाशी झालेल्या स्फोटात काही कुटुबियांनी आपले आप्त गमावले, अनेक जण जखमी झाले. या भयानक दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळतोय. मी व्यक्तिशः आणि शिवसेना पक्षातर्फे सहवेदना व्यक्त करतो, आणि या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना अंतःकरणपूर्वक श्रध्दांजली वाहतो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या तपासावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपासाअंती स्फोटामागील कारणे स्पष्ट होतीलच, असे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेबाबत सद्गती आणि सहवेदनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
