डोंबिवली– येथील पूर्व भागातील कल्याण-शिळ रस्त्यावरील मानपाडा चौकात शुक्रवारी दुपारी भरधाव वेगात असलेल्या एका रिक्षा चालकाने एका दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरून खाली पडून चालकासह दुचाकीवर पाठीमागे बसलेले ६२ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले.या जखमींना वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेण्याऐवजी रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला. ज्येष्ठ नागरिकावर एमआयडीसीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रकांत वाळकु जोशी असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबाच चौक भागात राहतात.
पोलिसांनी सांगितले, चंद्रकांत जोशी यांचा मित्र बन्सी पाखरे यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसून प्रवास करीत होते. जोशी नांदिवली टेकडी भागात राहत असलेल्या आपल्या मुलीच्या घरातून निघून ठाकुर्ली येथे जात होते. शिळ रस्त्यावरील मानपाडा सर्कल येथे वळण घेत असताना पाठीमागून भरधाव वेगात एक रिक्षा चालक आला. त्याने पाठीमागून बन्सी पाखरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेत दुचाकी रस्त्यावर पडून जोशी, पाखरे या धडकेत जखमी झाले.




हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत ११ हजार गौरी-गणपतींचे विसर्जन
दुचाकीवरुन जोरात पडल्याने ज्येष्ठ नागरिक जोशी यांच्या हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोशी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.