मोक्याच्या जागांचा अभाव, अवाढव्य खर्च आणि त्या तुलनेत नागरिकांचा मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेता निवडणूक प्रचाराच्या व्यूहरचनेतून आता मोठय़ा नेत्यांच्या प्रचारसभांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांच्या पालिका निवडणुका येत्या चार दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी अद्याप या दोन्ही शहरांत कोणत्याही राजकीय पक्षाची एकही प्रचारसभा झालेली नाही. शनिवार-रविवारी काही बडे नेते दोन्ही पालिका निवडणूक प्रचाराच्या धुळवडीत सहभागी होणार असले तरी तोही निव्वळ औपचारितेचा भाग असणार आहे.
मोठय़ा प्रचारसभांमुळे वातावरणनिर्मिती होत असली तरी तिचे आयोजन करण्यात कार्यकर्त्यांना बरीच धावपळ करावी लागते. अंबरनाथमध्ये पूर्व विभागात रेल्वे स्थानकालगत असलेले य. मा. चव्हाण खुले नाटय़गृह राजकीय पक्षांच्या तसेच नागरिकांसाठीही सोयीचे होते. सहज जाता येता राजकीय नेत्यांची भाषणे ऐकता यायची. वाहनतळ आणि बंदिस्त नाटय़गृह प्रकल्पासाठी या मैदानाचा बळी देण्यात आल्यानंतर आता प्रचारसभा पूर्व विभागातील गावदेवी मैदानात घ्यावा लागतात. या ठिकाणी मुद्दामहून वाट वाकडी करून नागरिक येत नाही. त्यांना मुद्दामहून ‘आणावे’ लागते. अन्यथा मोठय़ा नेत्याच्या सभेत समोर रिकाम्या खुच्र्या दिसल्या तर प्रचारापेक्षा अपप्रचारच अधिक होण्याची भीती असते. नुकत्याच झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी त्याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. गर्दी जमविण्याचा हा खर्च हल्ली राजकीय पक्षांना परवडत नाही. त्यात पालिकेच्या निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभांचा थेट प्रभागात किती उपयोग होतो, याविषयी उमेदवार साशंक असतात. त्यामुळेच हे ‘विकतचे दुखणे नको’ अशीच भूमिका बहुतेक उमेदवारांनी घेतल्याने यंदा प्रचारामधून मोठय़ा सभा वजा करण्यात आल्या आहेत.
पथनाटय़े आणि रॅलींवर भर
सभांपेक्षा स्थानिक कार्यकर्ते आणि रहिवाशांचा सहभाग असलेल्या रॅली तसेच पथनाटय़ांद्वारे मोठय़ा प्रमाणात प्रचार सुरू आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी विभागातील रहिवाशांचे बऱ्यापैकी मनोरंजन होत आहे.