२७ गावे संवेदनशील!

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक दोन दिवसांवर आली असून निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे.

महापालिका निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने आणि शांततेत पार पडावी म्हणून दोन हजार ५४९ कर्मचारी नियुक्त.

मतदान शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील ; पोलीस बंदोबस्तात वाढ

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक दोन दिवसांवर आली असून निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. महापालिका हद्दीतील संवेदनशील प्रभाग व मतदान केंद्रे कोणती यांची निवडणूक आयोगातर्फे चाचपणी करण्यात आली. त्यात डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांतील मतदान केंद्रे अधिक संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान निवडणूक आयोगापुढे असून त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

महापालिका हद्दीत एकूण ५४ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. त्यातील बहुतेक मतदान केंद्रे २७ गावांच्या परिसरात आहेत. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शहरातील निवडणूक व्यवस्थेचा आढावा घेतला. संवेदनशील मतदान केंद्रांमधील मतदान शांततेने व्हावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सहारिया यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत पत्रकारांना दिली.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या यापूर्वी झालेल्या निवडणुकीत अल्प मतदान झाले आहे. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीतही पुरेशा प्रमाणात मतदान झाले नव्हते. नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होत देशभरात मतदानाची टक्केवारी वाढली होती. मात्र सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या कल्याण-डोंबिवलीत मात्र ४५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. हा अनुभव विचारात घेऊन या वेळी महापालिका निवडणुकीसाठी ५५ टक्क्यांहून अधिक मतदान होईल, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवले जात आहेत, असे ते म्हणाले.

महापालिका निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया महापालिका मुख्यालयात आले होते. या वेळी त्यांच्यासोबत गृहसचिव के. पी. बक्षी, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, महापालिका आयुक्त ई. रवींद्रन उपस्थित होते.

२,५०० पोलीस तैनात

’महापालिका निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने आणि शांततेत पार पडावी म्हणून दोन हजार ५४९ कर्मचारी नियुक्त.

’महापालिका हद्दीत ९५७ गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या तीन तुकडय़ा, तीन पोलीस उपायुक्त, १० साहाय्यक पोलीस आयुक्त, ५८ पोलीस निरीक्षक, २९४ पोलीस उपनिरीक्षक, ९९ बंदोबस्तासाठी वाहने तैनात.

’निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करीत नाही, असे सहारिया यांनी स्पष्ट केले.

 

२७ गावांसह इतर संवेदनशील मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे, तसेच आतापासूनच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

– परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, ठाणे

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Election commission trying peaceful election

ताज्या बातम्या