फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका होण्याचा अंदाज; अनुभवी कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने घेण्याची तयारी

ठाणे : महापालिका निवडणुका पुढील वर्षांच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका होण्याचा अंदाज बांधत प्रशासनाने निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली असून त्यासाठी निवडणुकीच्या कामाचा अनुभव असलेल्या लिपिकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कच्ची प्रारूप प्रभाग रचना करण्याचेही काम सुरू केले आहे. 

राज्यातील पंचवार्षिक मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्यामध्ये ठाणे महापालिकेचाही समावेश आहे. ही निवडणूक बहु सदस्य पद्धतीने होणार असून त्याप्रमाणे कच्ची प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच दिले होते. या आदेशानुसार ३० नोव्हेंबपर्यंत कच्ची प्रारूप प्रभाग रचना करावी लागणार असल्याने पालिकेने गेल्या काही दिवसांपासून या कामाला सुरुवात केली आहे. हे काम महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडून करण्यात येत आहे. या समितीकडून यापूर्वी एक सदस्य पद्धतीने कच्ची प्रभाग रचना करण्याचे काम करण्यात आले होते. ही रचना बदलून समितीकडून आता तीन सदस्य पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे. या प्रभाग रचनेकडे सर्वाचे लक्ष लागले असून इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

करोना तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ठाणे महापालिका निवडणूक लांबण्याची शक्यता काही महिन्यांपूर्वी वर्तविली जात होती. परंतु शहरात करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने निवडणूका वेळेवर होण्याची शक्यता आहे.

पालिकेने जाहिरात काढली

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निवडणुका फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेने असाच काहीसा अंदाज बांधत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने निवडणूक कामांसाठी अनुभवी लिपिकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार महापालिका निवडणुकीच्या कामाचा अनुभव असलेल्या सेवा निवृत्त लिपिकांची भरती करणार आहे. सुरुवातीला तीन लिपिक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने जाहिरात काढली आहे.