scorecardresearch

“…म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात”, राज ठाकरेंनी केली प्रतिक्रिया व्यक्त

Raj Thackrey : ठाण्यात एका खाजगी कार्यक्रमासाठी राज ठाकरे आले असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हायला हव्यात, असे मत व्यक्त केले.

“…म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात”, राज ठाकरेंनी केली प्रतिक्रिया व्यक्त
राज ठाकरे

ठाणे : नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीची गरज असते. त्यांच्या माध्यमातूनच सभागृहात आवाज उठवला जातो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हायला हव्यात, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान व्यक्त केले. तसेच ज्या सोयी सुविधा महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे. त्या सुविधा बांधकाम व्यवसायिक रहिवाशांकडून पैसे घेऊन पुरवतात. त्यामुळे शहरे ही महापालिका नव्हे तर बांधकाम व्यवसायिक चालवत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

ठाण्यात एका खाजगी कार्यक्रमासाठी राज ठाकरे आले होते. या कार्यक्रमापुर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतीत काहीच निश्चित दिसत नाही. त्या कधी होतील, याबाबत विविध चर्चा ऐकायला येतात. पण नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातूनच समस्या सोडवल्या जातात. ते जर सभागृहात नसतील तर नागरिकांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार असा प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या निवडणूका या लवकरात लवकर व्हाव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> ठाणेकरांपुढील पाणी टंचाईचे संकट टळले; स्टेम प्राधिकरणामार्फत होणारे दैनंदिन देखभाल दुरूस्तीचे काम रद्द

बहुसदस्य पध्द्तीने निवडणुका घेणे ही काही राजकीय पक्षांची सोय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजपा यांनी या पध्द्तीने निवडणूका का घेण्याचे ठरवले हा प्रश्नच आहे. यापूर्वी एकसदस्य पद्धतीने निवडणुका होत नव्हत्या का असा प्रश्न ही त्यांनी विचारला. बहुसदस्य पध्द्तीत एकाच पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्येच एकमत नसते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या कशा सुटतील असेही ते म्हणाले. शहरातील वाहतूक व्यवस्थेविषयी देखील त्यांनी मत व्यक्त केले. एका व्यक्तीकडे किती वाहने हवीत यालाही मर्यादा हव्यात. आपल्या देशात नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडूण त्याची सवय लावून घेतली तरच मेट्रो सारखे प्रकल्प यशस्वी होऊ शकतील असेही ते म्हाणाले.

हेही वाचा >>> साहाय्यक आयुक्त बदलताच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात

ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाशी संबंधित त्यांचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना आठवणींचा किस्सा त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितला. ठाण्यात क्रिकेट सामना पाहण्यासाठी राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठाण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी हा सामना असल्याने त्यांनी रात्री ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आराम करायचे ठरवले. परंतु उन्हामुळे गाद्या तापल्या होत्या. अखेर कुलरचे पाणी अंगावर ओतून झोपावे लागले, अशी आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 17:35 IST

संबंधित बातम्या