वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेले बदलापूरकर वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठय़ामुळे अक्षरश: हैराण झाले असून रात्री वीज खंडित होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढीस लागल्याचे चित्र आहे.

वातावरणातील बदलाने यंदा राज्यात सर्वत्र तापमानाने उच्चांक गाठला आहे. अशा वेळी दिवसाच्या उकाडय़ाने हैराण नागरिकांना रात्री थोडा दिलासा मिळतो. बदलापूर शहरात मात्र रात्रीच्या वेळेत वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असतो.

गेल्या काही दिवसांपासून रात्रीही हे प्रमाण वाढल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.  गेल्या आठवडाभरापासून बदलापूर पश्चिमेत वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

इतकेच नव्हे तर दिवसाची सुरुवातही अनेकदा विजेविनाच होत असते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. बदलापूर शहरात अनेक भागांमध्ये पावसाळ्यापूर्वीची महावितरणाची कामे सुरू आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फेही विजेच्या तारांच्या शेजारी झाडांची छाटणी करण्याची कामे सुरू आहेत. त्यात आठवडय़ाच्या प्रत्येक शुR वारी मोठे भारनियमन केले जात आहे. शुR वारी होणाऱ्या सहा ते सात तासांच्या भारनियमनात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच इतर दिवशीही तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांत प्रचंड संताप आहे.

विजेची मागणी उन्हाळ्यात वाढत असल्याने त्याचा सेवेवर परिणाम होऊ न वीजपुरवठा खंडित होत असल्याचे महावितरणचे कर्मचारी सांगतात.

उन्हाळ्यात मागणीपेक्षा अतिरिक्त वापर होत असल्याने त्याचा सेवेवर भार पडत असतो. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. महावितरणचे कर्मचारी सतत कार्यरत असतात. त्यांच्या मदतीने सेवा तात्काळ पूर्ववत करण्याचे आमचे प्रयत्न असतात.

-कल्पना आहेर, उपअभियंता, बदलापूर.

गेल्या आठवडाभरापासून हा प्रकार सुरू आहे. उन्हाळ्यात बदलापूर शहरात वीज खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. यंदा मात्र या प्रकारांनी टोक गाठले आहे. विजेची मागणी वाढते हे कारण काही नवे नाही. त्या दृष्टीने महावितरणने नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

– विकी जावळे, नागरिक.