८६ हजार वीज जोडण्या खंडित

वीज बिले न भरल्याने महावितरणने या सर्व ग्राहकांच्या वीज मीटर जोडण्या कायमस्वरूपी बंद केल्या आहेत..

ग्राहकांनी देयके वेळेत न भरल्याचा परिणाम, महावितरणाला ७२ कोटींचा फटका

वसईकरांना महावितरणची अवाजवी देयके येत असताना दुसरीकडे देयके न भरण्याची प्रवृत्ती वाढत आहे. वसईतील तब्बल ८६ हजार वीज ग्राहकांनी महावितरणची ७२ कोटी रुपयांची देयके थकविली आहेत. या सर्व ग्राहकांची मीटरजोडणी महावितरणने कायमस्वरूपी खंडित केली आहे. यामुळे महावितरणला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

महाराष्ट्रात महावितरणचे एकूण ९ झोन आहेत. वसई-विरार शहराचा कल्याण झोनमध्ये समावेश होतो. वसईत एकूण दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पूर्व आणि पश्चिम आणि वाडा यांचा समावेश आहे, तर नालासोपारा उपविभागात विरार, नालासोपारा पूर्व, पश्चिम आणि आचोळे यांचा समावेश आहे. नालासोपारा विभागात सव्वा पाच लाख ग्राहक आहेत, तर वसई विभागात २ लाख ४० हजार ग्राहक आहेत. मात्र दोन्ही विभाग मिळून ९५ हजार ३०७ ग्राहकांनी तब्बल ७८ कोटी ३७ लाख रुपयांची महावितरणची वीज बिले थकवली होती. वीज बिले न भरल्याने महावितरणने या सर्व ग्राहकांच्या वीज मीटर जोडण्या कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. यामुळे महावितरणला ७८ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

अभय योजनेला अल्प प्रतिसाद

वीज देयकांची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने नोव्हेंबर २०१५ मध्ये अभय योजना सुरू केली होती. ज्या ग्राहकांचे वीज मीटर कायमस्वरूपी खंडित करण्यात आले आहेत, त्यांनी दंड किंवा व्याज न भरता मूळ रक्कम भरली तर त्यांना त्वरित मीटर जोडणी करून देण्यात येत होती. एप्रिल महिन्यात ही मुदत संपली; परंतु या योजनेला खास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ ९ हजार ६५९ ग्राहकांनी या योजनेअंतर्गत मूळ रक्कम भरून वीज जोडणी करून घेतली आहे. त्या रकमेपोटी महावितरणकडे ६ कोटी ३६ लाख रुपये जमा झाले आहेत. म्हणजे अजूनही महावितरणला सुमारे ७२ कोटी रुपयांची तूट आहे.

१३ हजार अर्ज नवीन मीटरच्या प्रतिक्षेत

वसईत सदोष मीटरमुळे ग्राहकांना अवाजवी वीज देयके येत आहेत. ही सदोष वीज मीटर महावितरणातर्फे बदलून देण्यात येत आहेत. सध्या महावितरणाकडे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १३ हजार २५९ वीज ग्राहकांनी नवीन वीज मीटर साठी अर्ज केले आहेत तर १२६ शेती वापराच्या ग्राहकांनी नवीन मीटरसाठी अर्ज केले आहेत. या सर्वाना नवीन मीटर वीज मीटर पुढील आठवडय़ात देण्यात येतील अशी माहिती अधीक्षक अभियंता पापडकर यांनी दिली. सदोष वीज मीटर पुरविणार्म्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

आम्ही नागरिकांना वारंवार वीज देयके भरण्याचे आवाहन करत आहोत. अद्यापही ८६ हजार वीज जोडण्या कायमस्वरूपी खंडीत करण्यात आलेल्या आहेत. या ग्राहकांनी ३० जून पर्यंत जर थकीत रक्कम भरली तर त्यांचे वीज मीटर पुर्ववत जोडून देण्यात येतील

महेंद्र पापडकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Electricity supply mahavitaran

ताज्या बातम्या