डोंबिवली जवळील हेदुटणे गावाच्या हद्दीत काही व्यक्ति व्यापारी गॅस सिलिंडरमधील गॅस घरगुती गॅस सिलिंडरमध्ये भरून घरगुती गॅस सिलिंडरची चढ्या दराने बाजारात विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणाची एक दृश्यचित्रफित समाज माध्यमावर प्रसारीत होताच, मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या दृश्यचित्रफितीमध्ये दिसणारा टेम्पो, त्याचा साहाय्यक यांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घरगुती, व्यापारी गॅसच्या किमतींनी एक हजाराचा टप्पा पार केला आहे. स्वयंपाकासाठी दर महिन्याला सिलिंडर खरेदी करायचा कसा असा प्रश्न रहिवाशांसमोर आहे. या संधीचा गैरफायदा घेत काही सिलिंडर वितरक कर्मचारी गॅस एजन्सीच्या गोदामातून घरगुती, व्यापारी सिलिंडर ग्राहकांना देण्यासाठी घेऊन जातात. ते थेट ग्राहकाकडे न जाता आडबाजुला जाऊन सिलिंडर मधील काही गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये काढून घेऊन तो गॅस सिलिंडर कमी किमतीला विक्री करून पैसे उकळत असल्या्चे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. एजन्सी मालकाला अंधारात ठेऊन हा प्रकार सुरू असल्याचे कळते.
काटई-बदलापूर रस्त्यावरील हेदुटणे गावात एका टेम्पोतून घरगुती, व्यापारी गॅस सिलिंडर एकत्र आणले जातात. टेम्पो आडबाजुला नेऊन व्यापारी टाकीमधील गॅस घरगुती सिलिंडरमध्ये बेकायदा भरण्याचे काम केले जाते. हा प्रकार एका जागरूकाने मोबाईलमध्ये कैद करून ती दृश्यचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारीत केली. पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेऊन टेम्पो चालक व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या प्रकरणातील इतर सहभागींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
गेल्या आठवड्यात एमआयडीसीतील दोन एजन्सीमधील ३७ घरगुती गॅस सिलिंडरचा अपहार दोन गॅस वितरक कर्मचाऱ्यांनी करून एजन्सी मालकाच्या ५८ हजार रूपये रकमेचा अपहार केला आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही सिलिंडर वितरक कामगार फरार आहेत. ते सागर्ली गावात भाड्याच्या घरात राहत होते. ते मुळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत.