scorecardresearch

टाळेबंदीनंतर सव्वा लाख कुटुंबीयांना रोजगार; ‘मनरेगा’च्या कामांना आजही प्रतिसाद

एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १ लाख २५ हजार ६५२ कुटुंबांतील ३० लाख ४ हजार ८८२ मजुरांना या योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.

‘मनरेगा’च्या कामांना आजही प्रतिसाद

ठाणे : मार्च २०२० मध्ये जगभर पसरलेला करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र टाळेबंदी जाहीर करण्यात आली. या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना मनरेगा या योजनेचा आधार मिळाला. ठाणे जिल्ह्यातही पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेतही मनरेगाच्या कामांना २५ टक्क्यांनी मागणी वाढली.

एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १ लाख २५ हजार ६५२ कुटुंबांतील ३० लाख ४ हजार ८८२ मजुरांना या योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.

 करोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांनी आपल्या मूळ गावाची वाट धरली. या वेळी ग्रामीण भागात नागरिकांना मनरेगा या योजनेचा लाभ मिळाला असून पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेतही मनरेगाच्या कामाला मोठी मागणी असल्याचे निदर्शनास आले.

सध्या ठाणे जिल्ह्यात फळ लागवड, फूल लागवड, रस्त्यांची कामे, घरांची कामे यांसारखी ३३१ कामे सुरू असून त्यावर ७ हजार ९०४ मजूर काम करत आहेत. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये ३ लाख ७१ हजार ४२२ मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट असून त्यापैकी २ लाख ८० हजार १६१ इतके म्हणजेच ८० टक्के मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तर मागील वर्षी म्हणजेच २०२०-२१ मध्ये ११६ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. करोनाकाळात मनरेगा योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या समिना शेख यांनी दिली. एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत १ लाख २५ हजार ६५२ कुटुंबांतील ३० लाख ४ हजार ८८२ मजुरांना या योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.  या योजनेअंतर्गत नियमानुसार मजुरांना मजुरी १५ दिवसांच्या आत प्रदान करणे बंधनकारक असून जिल्ह्यात मजुरांना मजुरी आठ दिवसांच्या आत देण्याचे प्रमाण ९६.८८ टक्के असून १५ दिवसांच्या आत मजुरी प्रदान करण्याचे प्रमाण १०० टक्के इतके आहे.

करोनाकाळात मनरेगा योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून योग्य प्रकारे त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  – समिना शेख,  गटविकास अधिकारी (मनरेगा),ठाणे जिल्हा परिषद

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Employment quarter million families after layoffs response mgnrega work even today akp