scorecardresearch

ठाकुर्ली रेल्वे यार्डातून अभियंत्याचे खंडणीसाठी अपहरण

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून मंगळवारी मध्यरात्री एका अभियंत्याचे १० लाख रूपयांच्या खंडणीसाठी चार अनोळखी व्यक्तिंनी अपहरण केले होते.

डोंबिवली- मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून मंगळवारी मध्यरात्री एका अभियंत्याचे १० लाख रूपयांच्या खंडणीसाठी चार अनोळखी व्यक्तिंनी अपहरण केले होते. अभियंत्याच्या पत्नीला मोबाईलवरून संपर्क करून तुमच्या पतीला अटक केली आहे. १० लाख रूपये दिले तर सोडू, अशी खंडणीसाठी धमकी दिली. पत्नीने तात्काळ रेल्वे नियंत्रण कक्षाला ही माहिती देताच पोलिसांनी अपहृत अभियंत्याचा तपास सुरू केला. पोलीस आपल्या मागावर आहेत कळताच अपहरणकर्त्यांनी अभियंत्याला ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ मोटारीने आणून सोडले, अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली.
मोहित कल्लू सिंह (२६) असे अपहरण झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री ते ठाकुर्ली यार्डात रात्रपाळीसाठी होते. कार्यालयात बसले असताना अचानक चार जण कार्यालयात आले. त्यांनी जबरदस्तीने मोहित यांना मोटारीत बसविले. मोहितच्या पत्नीच्या मोबाईलवर संपर्क करून १० लाख रूपये खंडणी मागितली. मोहितच्या पत्नीने रेल्वे नियंत्रण कक्षाला पतीच्या अपहरणाची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी मोहितला मोबाईलवर संपर्क सुरू केला. हे अपहरणकर्त्यांच्या निदर्शनास आले. आपण पकडले जाऊ शकतो या भीतीने त्यांनी मोहितला ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ रात्रीच आणून सोडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चार जणांचा शोध सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Engineer kidnapped thakurli railway yard ransom arrested railway control room thakurli railway of central railway amy

ताज्या बातम्या