अंबरनाथः कल्याण बदलापूर राज्य मार्गावर नादुरूस्त पेव्हरमुळे होणारे अपघात, शहरात वाहने उभी करण्यासाठी नसलेली जागा आणि इतर अनेक रखडलेल्या प्रकल्पांवरून आज अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ नगरपरिषदेच्या अभियंत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळही उपस्थित होते. अंबरनाथच्या प्रस्तावित सॅटीस प्रकल्पात बहुमजली वाहनतळाचा समावेश करून त्यानुसार नवा सुधारीत आराखडा तयार करण्यावर यावेळी एकमत झाले.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

हेही वाचा : ‘११ हफ्ते ग्राहकांचे १२ वा आमचा’ योजनेच्या नावाखाली ठाण्यातील ज्वेलर्सने घातला ५७ कोटींचा गंडा

अंबरनाथ शहरातील स्थानक परिसर कोंडीचा बनला आहे. कल्याण बदलापूर राज्यमार्गाचे काम काही ठिकाणी अपूर्ण आहे. त्यात काही चौकांमध्ये निखळलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांत संतापाचा सूर आहे. अशा वाहतूक समस्यांसह शहरातील रखडलेल्या विविध प्रकल्पांबाबतची आढावा बैठक अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्यालयात पार पडली. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यावेळी पालिकेच्या अभिंयंत्यांसह विविध संस्थांच्या अभियंत्यांची चांगली खरडपट्टी काढली. यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, माजी नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा : अंबरनाथ : चिखलोलीच्या कचराभूमीला पर्याय नाहीच आहे त्या जागेवर उपाययोजना करण्याचे निर्देश

कल्याण बदलापूर राज्य मार्गावर जीर्ण पेव्हर ब्लॉक काढून त्याजागी नवे लावण्याच्या सूचना यावेळी डॉ. किणीकर यांनी दिल्या. शहरातील वाहनतळांची समस्या गंभीर असून त्यासाठी अंबरनाथ स्थानकात प्रस्तावीत असलेल्या सॅटीस प्रकल्पात बहुमजली वाहनतळ प्रस्तावीत करण्याच्या सूचना यावेळी डॉ . किणीकर यांनी केल्या. यामुळे सॅटीस प्रकल्पाचा आराखडा बदलावा लागणार असून त्यासाठी वाढीव निधीही गरजेचा आहे. हा निधी मिळवला जाईल असे आश्वासन यावेळी डॉ. किणीकर यांनी दिले. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ पूर्व भागातील आंबेडकर नगर परिसरातील बुद्ध विहार टेकडी परिसरात घरांच्या भिंती कोसळल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे याभागात सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दिल्या. अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील १७ कुष्ठरोगी बांधवाना लगतच्या महानगरपालिकेप्रमाणे १५०० रुपये प्रतिमहिना अनुदान देण्याचे मंजूर करण्यात आले. अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण – बदलापूर राज्य मार्गाचे रुंदीकरण करण्याकरिता रस्त्यालगत असलेल्या दिव्यांग बांधवांच्या टपऱ्या तोडण्यात आल्या होत्या. त्याही दिव्यांग बांधवाना नगरपरिषदेमार्फत जागेची पाहणी करून पुन्हा टपरी बांधण्यास परवनागी देण्याबाबत यावेळी सूचवण्यात आले. एमएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून सुरू असलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच जी विकास कामे कंत्राटदारा मार्फत अर्धवट सोडण्यात आली आहेत. अशा सर्व कामांची छायाचित्रांसह माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागात एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक सुलभीकरणासाठी दुभाजक लावत वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.