भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सुमारे १०० विद्यार्थ्यांना ते यापूर्वी शिक्षण घेत असलेल्या इंग्रजी शाळांकडून शुल्क भरणा न केल्याने शाळा सोडल्याचे दाखले मिळालेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या मराठी शाळा चालकांमध्ये यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. शाळा प्रमुख, कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभाग प्रमुखांनी इंग्रजी शाळा चालकांना वारंवार पत्रे पाठवून विद्यार्थ्यांचे दाखले देण्याची मागणी केली आहे.
प्रथम या विद्यार्थ्यांनी शाळेचे न भरणा केलेले गेल्या अडीच वर्षातील लाखो रुपयांचे शुल्क भरणा करावे मग त्यांनी दाखला घेऊन जावा, असे इंग्रजी शाळा चालकांकडून शिक्षण विभाग अधिकारी, मराठी शाळा मुख्याध्यापक, चालकांना सांगितले जात आहे.

हेही वाचा >>>टिटवाळा रेल्वे स्थानकात झवेरी बाजारातील व्यापाऱ्याकडून १ कोटी ७१ लाख हस्तगत; टिटवाळा रेल्वे सुरक्षा बळाची कारवाई

गेल्या अडीच वर्षाच्या करोना महासाथीच्या काळात इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या. नियमित रोजगाराचे साधन तात्काळ मिळाले नाही. आर्थिक ओढाताण सुरू झाली. अशा पालकांनी कल्याण डोंबिवली परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलांना इंग्रजी शाळेचे चढे शुल्क परवडत नसल्याने मराठी माध्यमाच्या शाळेत टाकणे पसंत केले. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क असल्याने मराठी माध्यमाच्या बहुतांशी शाळा चालकांनी इंग्रजी माध्यमातून नवीन प्रवेशासाठी आलेल्या मुलांना त्यांच्या आधारकार्डवर शाळेत प्रवेश दिले. या मुलांच्या पालकांना लवकरात लवकर इंग्रजी शाळेतून मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला घेऊन येण्याच्या सूचना केल्या. आता दोन वर्ष उलटली तरी पालक मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला मराठी शाळेत देऊ न शकल्याने शाळा चालक, मुख्याध्यापक अस्वस्थ झाले आहेत. इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गातील हे विद्यार्थी आहेत, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील कोपर पूर्वमध्ये नाल्यावरुन प्रवाशांचा धोकादायक प्रवास

कडोंमपात १०० विद्यार्थी
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे १०० विद्यार्थी अशाप्रकारे शाळा बदल करुन शिक्षण घेत आहेत. करोना महासाथीच्या काळात शाळा बदल केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने, प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेतलेले आहे. शाळा सुविधांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांनी अडीच वर्षाच्या काळात शाळेत भरणा न केलेला थकित शुल्क भरणा करुन दाखले घेऊन जावेत, अशी इंग्रजी शाळा चालकांची भूमिका आहे. इंग्रजी शाळा चालकांनी पालकांना थकीत शुल्काचे टप्पे करुन द्यावेत. त्यांच्या अडचणी समजून काही सूट देऊन शुल्क भरणा करुन शाळा सोडल्याचे दाखले द्यावेत म्हणून पालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी विजय सरकटे यांनी इंग्रजी शाळा चालकांना सुचविले आहे.

हेही वाचा >>> ठाणे : कशेळी-काल्हेर भागात तीन तासांपासून बत्तीगुल

करोना महासाथीच्या काळात इंग्रजी शाळेतील अनेक मुले मराठी शाळांमध्ये दाखल झाली आहेत. या मुलांनी शाळा सोडताना इंग्रजी शाळेचे शुल्क थकविल्याने शाळा चालक त्यांना थकित शुल्क भरणा केल्या शिवाय शाळा सोडल्याचे दाखले देत नाहीत. अशा मुलांना मराठी शाळांनी आधारकार्डवर शाळा प्रवेश दिले आहेत. हा तिढा लवकर सुटला पाहिजे. शिक्षण विभागाला याविषयी कळविण्यात आले आहे. – अजयकुमार जोगी , मुख्याध्यापक, महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली

इंग्रजी शाळांमधून मराठी शाळेत दाखल झालेली सुमारे १०० मुले कडोंमपा हद्दीत आहेत. त्यांचे दाखले इंग्रजी शाळा चालकांनी द्यावेत, पालकांना शुल्कामध्ये काही सवलत, टप्पे द्यावेत म्हणून सुचविले आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. – विजय सरकटे , प्रशासनाधिकारी ,कडोंमपा

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: English schools withheld certificates due to non payment of fees amy
First published on: 03-10-2022 at 18:30 IST