करोना निर्बधांमुळे उद्योग डबघाईला; कामगारांचे थकीत वेतन, कारखान्याचे थकलेले भाडे यांमुळे उद्योग बंद करण्याची नामुष्की

किशोर कोकणे
ठाणे : नव्या कल्पना, ध्यास, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार करून पाच ते सहा वर्षांपूर्वी उद्योग क्षेत्रात उतरलेले नवउद्यमी, लघुउद्योजक करोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बधांमुळे आता मेटाकुटीस आले असून ठाणे, नवी मुंबई तसेच जिल्ह्य़ातील औद्योगिक पट्टय़ातील अनेकांपुढे आर्थिक डबघाईचे संकट आ वासून उभे राहिले आहे. ठप्प व्यवसाय, कारखान्यांचे भाडे, कामगारांचे थकीत वेतन यांमुळे चार ते पाच वर्षांपूर्वी सुरू केलेले व्यवसाय बंद करण्याची वेळ अनेकांवर येऊ लागली आहे.

इतरांपेक्षा वेगळे काही तरी करायचे, उद्योजक म्हणून नाव कमवायचे या हेतूने मुंबई, ठाण्यातील अनेक तरुणांनी नोकऱ्या सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी उद्योग सुरू झाल्यानंतर दोन ते तीन वर्षांतच लाखो रुपयांच्या उलाढालीचा पल्ला गाठला. असे असताना गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे जाहीर झालेली टाळेबंदी आणि र्निबधांच्या चक्रामुळे उद्योगाचे चक्र मंदावले आहे. अनेक लघुउद्योजकांची आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेली असून नफ्याचे गणित तोटय़ात जाऊ लागले आहे. राज्य किंवा राज्याबाहेरील ग्राहकांकडून नवे काम मिळेना झाले आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही हीच परिस्थिती आहे. असे ठाणे, डोंबिवली पट्टय़ात कार्यरत असलेल्या लघुउद्योजकांचे म्हणणे आहे.

उद्योग क्षेत्रात मोठय़ा कंपन्यांना त्यांचे उत्पादन बनविण्यासाठी अनेक वस्तूंची गरज भासत असते. या वस्तू लघुउद्योजक बनवत असतात. मोठय़ा कंपन्या आणि लघुउद्योजक यांचा थेट संपर्क होत नव्हता. ही गरज ओळखून मुंबईतील राजेंद्र गांगण यांनी चार वर्षांपूर्वी ‘ऑनलाइन मॅन्युफॅक्चरिंग डॉट इन’ या कंपनीची स्थापना केली. त्यांच्या कंपनीमार्फत मोठय़ा कंपन्या लघुउद्योजकांसोबत संपर्कात येऊ लागल्या. कंपनीलाही  (पान ४ वर)

नवउद्यमी, लघुउद्योजक आर्थिक संकटात

यामध्ये नफा मिळत होता. करोनामुळे अवघ्या काही दिवसांत ही परिस्थिती बदलली आहे. मोठय़ा कंपन्यांकडून काम मिळणे बंद झाले. माझ्या कंपनीसोबत शेकडो लघुउद्योजक जोडले आहेत. काम मिळत नसल्याने या उद्योजकांची अडचण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लघुउद्योजकांचा विचार केला नाही तर यातून सावरणे कठीण आहे, असे गांगण यांनी सांगितले.

वसईतील उद्योजक विजेंद्र पवार यांनीही चार वर्षांपूर्वी ‘मॅपल मोल्ड अँड डाईज इंडिया प्रा. लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी प्लास्टिकच्या वस्तू, उत्पादनाचे साचे बनविते. सुरुवातीला देश -विदेशातून त्यांच्या उत्पादनाला मागणी येत होती. २०२१मध्ये करोनाची दुसरी लाट आल्याने त्यांना काही महिन्यांसाठी व्यवसाय बंद करावा लागला. कारखाना आणि कार्यालयाचे सुमारे ७५ हजार रुपये मासिक भाडे त्यांना द्यावे लागत होते. व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना कार्यालयातील सहा संगणक, फर्निचरची विक्री करून जागामालकाला भाडे देण्याची वेळ आली. त्यांच्या कंपनीत २० कामगार काम करतात. या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड येऊ नये तसेच उद्योगविश्व पुन्हा उभारी घेईल या आशेने त्यांनी कारखान्यातच कार्यालय सुरू केले आहे. कामगारांचे वेतन रखडवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

२०१८ मध्ये ठाण्यातील मनीष भिंगार्डे यांनी ‘कमल आरंभ’ नावाने टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला. त्यांची गाडी रुळावर येत असतानाच २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर महिन्याभरात त्यांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. त्यांनी आता कलमआरंभ या नावानेच यार्न, प्लास्टिकच्या वस्तू तयार करणारा नवा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, निर्बधांमुळे हा व्यवसायही अडचणीत आहे.

राज्य सरकारने उद्योजकांसाठी काही महत्त्वाचे धोरण आखणे गरजेचे आहे. सरकारने उद्योजकांसोबत चर्चा करून मार्ग काढावा. तसेच लघुउद्योजकांवरील विद्युत शुल्कामध्ये पुढील तीन वर्षे सूट द्यावी.

– सुजाता सोपारकर, उपाध्यक्ष, ठाणे स्मॉल स्केल इंड्रस्ट्रीज असोसिएशन (टिसा)