scorecardresearch

डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेत पर्यावरणाचा जागर

निर्बंधमुक्त स्वागत यात्रा असल्याने लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

padawa dombivali
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन येथील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत बुधवारी पर्यावरणाचा जागर करण्यात आला. निसर्ग, पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे आकर्षक चित्ररथ लक्षवेधी होते. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान येथून सकाळी साडे सहा वाजता सुरू झालेल्या स्वागत यात्रेत शहरातील नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. निर्बंधमुक्त स्वागत यात्रा असल्याने लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

गणेश मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. ढोल-ताशा, लेझिम पथकांचा गजर, टाळ-चिपळ्या घेऊन भजन गाणारी मंडळे, स्वच्छता, आरोग्य याचा संदेश देणारे फलक यामुळे डोंबिवली पहाटेपासून दुमदुमून गेली होती. विविध दूरचित्रवाणी मालिकांमधील महिला पुरूष, कलाकार स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्या सोबत छबी काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. रस्तोरस्ती हा आनंदोत्सव सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरात स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी आगमन झाले. या आनंदोत्सवात राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची सरमिसळ झाली. काही वेळ पोलीस फौजफाटा, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत छबी काढण्यासाठी सरसावलेले मोबाईल कॅमेरे असे दृश्य रस्त्यावर, व्यासपीठावर होते. मुख्यमंत्री शिंदे यांनीही आबालवृध्दांना जवळ घेऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले, त्यांना मनमोकळी सोबतची छायाचित्र काढून दिली.

आणखी वाचा- पनवेल: नववर्ष शोभायात्रेत उत्साहाला उधाण

बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिक, विविध वयोगटातील महिला-पुरूष आणि विशेष म्हणजे तरुण-तरुणी आकर्षक, पारंपारिक पेहरावात स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. देवदेवतांची वेशभुषा केलेली लहान मुले यात्रेत लक्षवेधून घेत होती. ढोल-पथकांचे आकर्षक ढोलवादन, लेझिम पथकांच्या चित्तथरारक हालचाली पाहण्यासाठी झुंबड उडत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ हा संदेश जगभर दिला आहे. तळागाळातील सामान्यांपर्यंत हा संदेश काय आहे याची महती पोहचावी या उद्देशातून गणेश मंदिर संस्थानने यावेळी ही संकल्पना घेऊन त्या आधारे स्वागत यात्रेचे नियोजन केले आहे. वाढती वृक्षतोड, वाढते उष्णतामान, हवामान बदलामुळे निसर्ग, पर्यावरण, जीवसृष्टी, जैवविविधतेवर कसे परिणाम होत आहेत. वाढत्या पाण्याच्या उपशामुळे भूजल पातळी कशी घटत आहे. पक्ष्यांचे अधिवास कसे धोक्यात आले आहेत. याची माहिती चित्ररथांवरील देखाव्यातून देण्यात आली होती. ही माहिती प्रत्येकाला विचार करावयास लावणारी होती.

डोंबिवली पश्चिमेतील कान्होजी जेधे मैदान (भागशाळा मैदान) येथून स्वागत यात्रेला सुरुवात झाली. गोपी सिनेमा, हॉटेल सम्राट, पंडित दिन दयाळ रस्ता, कोपर पूल, शिवमंदिर रस्ता, मानपाडा रस्ता, बाजीप्रभू चौकातून फडके रस्त्याने स्वागत यात्रा गणेश मंदिराकडे विसर्जित झाली. स्वागत यात्रेचे रस्तोरस्ती फुलांच्या पाकळ्यांनी राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्थांकडून स्वागत केले जात होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन होण्यापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्वतव रस्ता बदल करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, आ. प्रमोद पाटील स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. शहरात एकीकडे स्वच्छता, पर्यावरणाचा संवर्धनाचा जागर स्वागत यात्रेच्या माध्यमातून सुरू असताना डोंबिवलीत रस्तोरस्ती राजकीय मंडळींनी लावलेले शहराचे विद्रुपीकरण करणारे भव्य फलक, वाहनांना अडथळा ठरणाऱ्या कमानी नेते मंडळींनी काढून टाकाव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमी मंडळींकडून केली जात होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 14:23 IST

संबंधित बातम्या