कामे सुधारणेच्या नावाखाली वसई-विरार महापालिकेच्या अंदाजपत्रकातील खर्चात दुपटीने वाढ

वसई : नियोजनाच्या अभावामुळे अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या कामांसाठी दुप्पट खर्च होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बोळिंज येथील सांस्कृतिक केंद्राचे १ कोटी ८० लाखांचे काम तीन कोटींवर गेले आहे, तर उमेळा येथील स्मशानभूमीच्या कामाचा खर्चही कोटय़वधी रुपयांनी वाढला आहे. कामे प्रस्तावित करताना पालिकेने नेमलेले सल्लागार करतात काय, असा सवाल शिवेसनेने केला आहे. मात्र कामांच्या अंदाजपत्रकात नंतर सुधारणा होत असते. त्यामुळे खर्च वाढतो, असे सांगून पालिकेने पैसा वाया जात नसल्याचा दावा केला आहे.

विरार पश्चिमेच्या बोळिंज येथील भूमापन क्रमांक ४०१मध्ये महापालिकेने सांस्कृतिक केंद्र बनवण्याचे काम हाती घेतले आहे. २० जानेवारी २०१४ रोजी या कामाचा ठराव झाला होता. १ कोटी ८० लाख २२ हजार ८५६ रुपयांचे हे काम ई-निविदा प्रक्रियेद्वारे मेसर्स गजानन कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले. ४ मार्च २०१४ रोजी या कामाचा कार्यादेश काढण्यात आला होता. चार वर्षे होत आली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. काम अर्धवट असताना आता पुन्हा याच सांस्कृतिक भवनाच्या वाढीव कामासाठी नव्याने एक कोटी २५ लाख रुपयांची निविदा प्रस्तावित केली आहे. यामुळे मूळ काम ३ कोटींवर जाणार आहे. नव्या कामात ‘सेफ्टी टँक’ बांधली जाणार आहे. शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांना या कामाची कुणकुण लागताच त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे पालिकेने महासभेत हा विषय तांत्रिक कारण देत पुढे ढकलला आहे.

महापालिकेने काम करण्यापूर्वी अभ्यास करण्यासाठी सल्लागार कंपन्या नेमल्या आहेत. मेसर्स टंडन कन्सल्टंट ही पालिकेची कंपनी आहे. मग सांस्कृतिक भवनाचा आराखडा बनवताना या सल्लागार कंपनीला सेफ्टी टँक असते हे माहीत नव्हते का, असा सवाल चेंदवणकर यांनी केला. एकाच कामाच्या अनेक निविदा काढून मलिदा खाण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्य इमारतीसाठी १ कोटी २९ लाख रुपये होते, नंतर त्यासाठी २ कोटी २५ लाख प्रस्तावित करण्यात आले आहे. हा सगळा पैसा लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘नियोजनशून्यतमुळे वाढीव खर्च ’

वसई पश्चिमेच्या उमेळा गावात स्मशानभूमीसाठी दहनशेड बनवण्याचे काम २०१४ मध्ये प्रस्तावित केले होते. तीन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. २०१४ मध्ये मेसर्स ओमकार कंपनीला २५ टक्के जादा दराने हे काम देण्यात आले होते. त्यात संरक्षक भिंत, भूमिगत टाक्या, प्रवेशद्वार, दहनशेड अशी कामे होती, मात्र पुन्हा वाढीव संरक्षक भिंत, वाढीव प्रवेशद्वार, मातीभराव, रंगकाम, वाढीव दहनशेड अशी कामे काढून हे काम वाढवण्यात आले. पूर्वी ३९ लाखांचे हे काम आता ८७ लाखांवर गेले आहे. अशाप्रकारे काम वाढवले जात असल्याबद्दल शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी टीका केली. या सर्व प्राथमिक गोष्टी आहेत. पहिल्याच कामात समावेश का केला गेला नाही, असे ते म्हणाले. कामात सुधारणा मान्य आहे, परंतु सेफ्टी टँक असेल किंवा प्रवेशद्वार असेल या प्राथमिक गोष्टी आवश्यक आहे त्याची कल्पना या सल्लागारांना नसते का, असा सवाल त्यांनी केला. कामांचा वाढीव खर्च हा पालिकेच्या नियोजनशून्यतेचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अंदाजपत्रकात कामांचा खर्च ठरवलेला असतो, मात्र त्यात पुढे सुधारणा होत असते. एखादे काम सुरुवातीला निश्चित झाल्यावर त्यात नगरसेवक, लोकप्रतिनिधी बदल सुचवत असतात. त्यामुळे खर्च वाढतो. दहा टक्क्य़ांपेक्षा जास्त खर्च असेल, तर तो महासभेपुढे मंजुरीला ठेवला जातो. जी वाढीव कामे असतात, ती मंजुरी घेऊनच केली जातात. त्यामुळे सुरुवातीला नियोजन केलेले नसते, असा आरोप चुकीचा आहे. एक काम निश्चित केल्यानंतर त्यात अनेक इतर कामांचा समावेश होत असतो.

-राजेंद्र लाड, मुख्य कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिका.