ठाणे : वसई पेट्रोल पंपावर विकल्या जाणाऱ्या इंधनावरुन हल्ली सर्वसामान्यांमध्ये वेगळ्याच प्रकारची अस्वस्थता आहे. समाज माध्यमांमध्ये तर वाहनांमधील बिघाड, इंधनातील पाणी, देखभाल दुरुस्तीसाठीच्या वाढलेल्या रकमा आणि अशाचप्रकारच्या तक्रारींचा अक्षरश: पूर आलेला दिसतो. इंधनात मिसळले जाणारे इथेनॉल या गडबडीमागील प्रमुख कारण असल्याचे यापैकी अनेकांचे म्हणणे आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रतिथयश वाहन दुरुस्त केंद्रात आपली वाहने घेऊन तपासणीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्येही सध्या हाच सुर ऐकायला मिळत आहे. पावसाळा सुरु झाला की रस्त्यावर खड्डे पडतात आणि वाहनांच्या तक्रारी वाढतात हा अनुभव नवा नाही.
यंदा मात्र इथॅनाॅल मिश्रीत इंधनामुळे वाहनांच्या वेगवेगळ्या तक्रारी घेऊन येणाऱ्या ग्राहकांची संख्या निश्चितच वाढली आहे, असे दुरुस्ती केंद्रातील वाहन दुरुस्तीकारांचे म्हणणे आहे. या तक्रारी इथेनाॅल मिश्रित इंधनामुळेच उद्धभवत आहेत का याबाबत मात्र अजूनही पुरेशी स्पष्टता येत नाही, असेही या मंडळींचे म्हणणे आहे. वाहनाच्या पेट्रोल टाकीजवळ मुंग्या लागणे, पेट्रोल टाकीच्या वेष्टनावर पाणी साचणे, इंजिनमध्ये बिघाड होणे, इंधनाची कार्यक्षमता कमी होणे अशा महत्वाच्या तक्रारींची सरबत्ती सध्या ग्राहकांकडून केली जात आहे. समाज माध्यमांवरही अशाच तक्रारी दिसतात. नेमक्या याच तक्रारी घेऊन वाहन मालक, चालक सतत येत आहेत, असे या दुरुस्तीकारांचे म्हणणे आहे. दुचाकी वाहन चालकांच्या यासंबंधीच्या तक्रारी वेगवेगळ्या स्वरुपाच्या आहेत.
वाहन पुर्वीसारखे उत्तम पद्धतीने चालत नाही, काही भाग अडकल्यासारखे भासतात अशा तक्रारीही हल्ली वाढल्या आहेत, असा अनुभव ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध नामांकित वाहन दुरुस्ती केंद्र आणि वाहन दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत साधलेल्या संवादातून ऐकायला मिळाला. मात्र इथेनाॅल मिश्रीत इंधनामुळेच हे होते आहे का याविषयी मात्र या दुरुस्तीकारांची वेगवेगळी मते आहेत. काय म्हणतात अनुभवी गॅरेज चालक ? ठाणे शहरात गेली ५२ वर्षे वाहन सेवा केंद्र चालविणारे जतीन ठाणावाला यांची हरिनिवास आणि वागळे इस्टेट येथे ”ठाणावाला मोटर एजन्सी” ही वाहन सेवा केंद्रे आहेत. त्यांनी सांगितले की, यंदाच्या उन्हाळ्यात वाहनांच्या कार्यक्षमतेत घट झाल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या. गाडीचा ‘एव्हरेज’ घसरला आहे ही तक्रार अनेकदा ठोस पुराव्यापेक्षा मनोविज्ञानाशी संबंधित असते असे एक तंत्रज्ञ म्हणून आम्हाला वाटते. त्यामुळे सुरुवातीला या तक्रारींकडे आम्ही दुर्लक्ष करायचो. मात्र माझ्या स्वतःच्या वाहनांचीदेखील कार्यक्षमता कमी झाल्याचा अनुभव आला. त्यानंतर ही समस्या आपोआप कमी झाली. यंदा उन्हाळ्यात तापमान अधिक असल्याने त्याचा वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.
ही समस्या केवळ इथेनॉल मिश्रित इंधनामुळेच उद्भवत आहे, असे ठामपणे सांगता येत नाही. परंतु तक्रारी वाढत आहेत हे मात्र नक्की. यावर उपाय म्हणून वाहनचालकांनी आठवड्यातून किमान तीन दिवस वाहन वापरावे आणि वेळेवर सर्व्हिसिंग करून घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. हरिनिवास येथील एका केंद्रात वाहन दुरुस्त करणाऱ्या एस. शेख या कर्मचाऱ्याने सांगितले की, मागील दोन महिन्यांपासून वाहन दुरुस्तीच्या तक्रारी वाढल्या आहेत. पूर्वी वाहनाच्या कार्यक्षमतेविषयी महिन्याला दोन ते तीन तक्रारी येत होत्या. परंतु त्याचे प्रमाण आता सात ते आठ झाले आहे. हा परिणाम नेमका कशाचा आणि इथेनॉल हेच कारण आहे का, असे सांगता येणार नाही असे शेख म्हणाले.
ठाण्यात दुचाकी गाड्यांचा वापर मोठा होत असतो. या गाड्यांची नियमीत तपासणी, दुरुस्ती करणारे चेतन दुबे या अनुभवी दुरुस्तीकाराच्या मते गेल्या काही महिन्यांपासून फ्युल इंजेक्टर आणि फिल्टर तुंबण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर कार्बन जमा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सहा-सात महिन्यात अगदी रोज अशी एखादी तक्रार माझ्याकडे येत असते. तक्रारींचा विचार तर करावाच लागेल… डोंबिवली येथील साहील मोटर्स मधील पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुुसार, वाहनातील इंधनात इथेनाॅलची भेसळ केल्यानंतर इंधनाचा वाहनाच्या ज्या भागांशी संबंधित येतो, ते भाग मजबुत धातू वेष्टनाचे असतात. वाहनाचे इंधनाशी संबंधित कनेक्ट बेअरिंग, पिस्टन, पिस्टन रिंग या भागावरील वेष्टन अधिक तापमानाने उडून जाऊन जे भाग खराब होण्यास पाच ते सहा वर्ष लागतात.
इथेनॉल मिश्रणाचा परिणाम जाणवल्यास ते भाग सहा ते आठ महिन्यात खराब होतील, अशी भीती नक्कीच आहे. वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत जाईल. कनेक्ट बेअरिंग (क्रॅक), पिस्टन, पिस्टन रिंग या भागांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च अधिक वाढेल अशी ठोस उदाहरणे अजूनही पुढे आली नसली तरी तक्रारी मात्र निश्चितच येत आहेत. इंधन वाहनाच्या ज्या भागातून प्रवाहित होते. ते भाग घर्षणाशी संबंधित असतात. त्यामुळे त्या भागांवरील वेष्टन उडून गेले की इंधन इथेनाॅलचा थेट संबंध या भागांशी येणार आहे. ते भाग तापून तापून खराब होतील, असे काही तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. इंधनातील इथेनॉल वापरामुळे वाहनाच्या कार्यक्षमतेवर सुमारे १० ते १५ टक्के परिणाम नक्कीच होईल, असे याच भागात काम करणारे अरविंदकुमार पांडे या तंत्रज्ञाने सांगितले. गेल्या दोन-तीन महिन्यात इतक्या तक्रारी का वाढल्या आहे याचा विचार तर करावाच लागेल असेही ते म्हणाले.
चौकट डोंबिवलीत गेली २५ वर्ष वाहन दुरुस्तीचा अनुभव असलेले शामल प्रजापती मात्र इथेनाॅल मिश्रणाचा वाहनांवर परिणाम दिसू लागला आहे असे ठामपणे सांगतात. वाहनात मिश्रीत इंधनाचा वापर झालेली काही वाहने दुरुस्तीसाठी येण्यास नक्कीच सुरूवात झाली आहे, असे प्रजापती म्हणाले. यापूर्वी पेट्रोल, ऑईल प्रमाणात घसारा होऊन वाहन धावत होते. आता इथेनाॅलच्या वापराने इंधन आणि इथेनाॅल समप्रमाणाचे गणित जुळत नाही. त्यामुळे इंधनाशी संबंधित वाहनाच्या भागावरील वेष्टन तापून त्यावरील वेष्टन उडून जात असल्याचे दिसते. आतापर्यंत दाखल झालेल्या देखभाल दुरुस्तीच्या वाहनांमध्ये हा फरक दिसून येऊ लागला आहे, असे ते म्हणाले. इथेनाॅलचा वाहनातील वापर ठीक असला तरी, वाहनातील इंधन वाहून नेण्याच्या प्रक्रियेत काही प्रमाणात बिघाड दिसू लागले आहेत, असा दावा त्यांनी केला. चौकट
वसईतील यादव गॅरेजचे मालक हरिंदर यादव यांनी पेट्रोलमधील भेसळीमुळे वाहनाचे होणारे नुकसान हे काही आजचे नाही, असे मत मांडले. आमच्या वाहन दुरुस्ती केंद्रात इंजिनसह विविध तांत्रिक बिघाड असलेली वाहने दुरुस्तीसाठी नियमीत येतात. मात्र, एखाद्या वाहनाच्या इंजिनमध्ये झालेला बिघाड हा केवळ पेट्रोलमधील भेसळ किंवा इथेनाॅल मिश्रणामुळेच झाला, असे ठामपणे सांगता येत नाही. तक्रारी मात्र वाढल्यात हे यादव यांनी मान्य केले. तसे पाहील्यास हा मनोवैज्ञानिक खेळही असू शकतो. समाज माध्यमांवर यासंबंधी बऱ्याच कहाण्या ऐकायला, पहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालक अस्वस्थ आहेत हे नक्की. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे वाहनचालकांनी दर्जेदार आणि विश्वासार्ह पेट्रोल पंपावरून इंधन भरावे. शक्य असल्यास प्रीमियम किंवा उच्च दर्जाचे पेट्रोल वापरावे. आम्ही काही शास्त्रज्ञ नाही. आमचे दुरुस्तीकार आहोत आणि सध्याचा अनुभव हाच आहे की इंधन वापर क्षमता कमी झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
आमच्याकडे प्रामुख्याने दुचाकी वाहने दुरुस्तीसाठी येतात. पावसाळ्यात अनेक वाहनांच्या इंधन टाकीत पाणी जाण्याच्या तक्रारी नेहमीच येत असतात. यंदाही असे प्रकार समोर येत आहेत. मात्र, काही ग्राहक टाकीत दिसणारा द्रव हा पाणी नसून इथेनॉल वेगळे झाल्यामुळे असल्याचा दावा करत आहेत. या दाव्याबाबत आमच्याकडे कोणताही ठोस पुरावा किंवा तांत्रिक निष्कर्ष नसल्याने निश्चितपणे काही सांगता येणार नाही, असे मिरा भाईंदर येथील मोहित मोटार सर्व्हिस सेंटरमधील कर्मचाऱ्याने सांगितले. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील काही पेट्रोल पंपांवर अद्याप इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री सुरू झालेली नाही असा दावा स्थानिक पंपचालकांनी केला. विशेष म्हणजे या भागात इथेनाॅल संदर्भातील वाहन बिघाडाच्या तक्रारी फारशा नाहीत असे येथील गॅरेज चालकांचे म्हणणे आहे. आम्ही सध्या समाजमाध्यमांवर चर्चाच ऐकतो आहोत, असे उल्हासनगर येथील राणा मोटर्सचे अनूप सिंग यांनी सांगितले. आमच्या दोन शाखांमध्ये दररोज अनेक वाहने दुरुस्तीसाठी येतात. मात्र, इथेनाॅल मिश्रित इंधनामुळे वाहनात बिघाड झाल्याची एकही तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.
