tn10स्वत:चे विचार प्रभावी आणि परखडपणे मांडणे हे उत्कृष्ट वक्त्याचे गुण असतात. तरुणांमध्ये असलेल्या वक्तृत्वगुणाचा विकास करण्यासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या वतीने डॉ. वा. ना. बेडेकर आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी बेडेकर महाविद्यालयाच्या कात्यायन सभागृहामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले विचार परखडपणे व्यक्त केले. नियोजित व उत्स्फूर्त अशा दोन टप्प्यांमध्ये या स्पर्धेत पुण्यातील सं. प. महाविद्यालयाच्या अभिषेक घैसास आणि मयूरेश शेर्डुणीकर यांनी पहिला क्रमांक पटकावला.
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या या स्पर्धेसाठी नाशिक, सातारा, पुणे, रत्नागिरी तसेच ठाणे, मुंबई परिसरातील महाविद्यालयांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘श्वास’ चित्रपटाच्या लेखिका तसेच कथाकथनकार माधवी घारपुरे, सूत्रसंचालिका व वृत्तनिवेदिका वासंती वर्तक व ज्येष्ठ पत्रकार रवींद्र मांजरेकर स्पध्रेस परीक्षक म्हणून उपस्थित होते. ‘स्वच्छ भारत अभियान : स्वप्न की वास्तव’, ‘स्त्री- पुरुष समानता – फक्त कागदावरच’ आणि ‘सोशल मीडिया : संवाद की विसंवाद’ या प्राथमिक फेरीतील विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत गेलेल्या पाच स्पर्धक जोडीला नवीन विषय देऊन उत्स्फूर्त स्पर्धा घेण्यात आली. अटीतटीच्या या स्पर्धेतून तीन स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात आले. प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुण्याच्या स. प. महाविद्यालयाच्या अभिषेक घैसास आणि मयूरेश शेर्डुणीकर यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या किरण कीर्तीकर आणि मिथुन माने यांनी दुसरा तर जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या पंकज चव्हाण आणि आशीष शिंदे यांनी तिसरा क्रमांक पटकावला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग व परीक्षकांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या वेळी प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी स्पध्रेचा आढावा घेत वादविवाद स्पध्रेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विमुक्त राजे व प्रा. महेश पाटील यांनी केले तर विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

आदर्श महाविद्यालयात ‘प्रिन्सिपल डे’
बदलापूर : बदलापूरातील आदर्श महाविद्यालयात नुकताच एक अनोखा दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयासाठी आजवर घेतलेल्या मेहनत व परिश्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांनी मिळून प्रिन्सिपल डे साजरा केला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांना विद्यार्थ्यांनी विशेष भेट दिली. नृत्य, गीत गायन असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व क्रीडा प्रशिक्षक जगदीश भोपी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांनी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या वेळी डॉ. चुरी, संस्थेचे विश्वस्त यशवंत वैद्य, श्री. कोशिंबे, श्री. बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘ज्ञानसेवा’ पुरस्कारांचे वितरण
ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा ज्ञानसेवा पुरस्कार यंदा जितेंद्र पवार आणि श्रीकांत शेलार या एनएसएस विभागातील विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात प्राचार्य चंद्रकांत मराठे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी अपर्णा जोशी आणि हर्निशा भोईर यांना प्राचार्या पारितोषिक, तर सिद्धेश शेळके, ऋचिका वरोसे आणि अफासना मुल्ला यांना कार्यक्रम अधिकारी पारितोषिक प्रदान करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मराठे, उपप्राचार्य भारती जोशी, कार्यक्रम अधिकारी किशोर वानखेडे आणि भूषण लनगी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्राचार्य मराठे यांनी एनएसएसच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मानसी जंगम