कल्याण – भिवंडी तालुक्यातील बापगाव हद्दीत एका शेतघरात एका पीडित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी भिवंडी सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश एन. के. कारंडे यांनी फेटाळून लावला.

हा आदेश देताना न्यायालयाने या गुन्ह्याच्या तपासातील तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले. पीडित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार, बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील फरार झाले आहेत. पडघा पोलिसांची सहा पथके या दोन्ही इसमांचा शोध घेत आहेत.

हे दोन्ही इसम पोलिसांना शरण येण्याऐवजी फरार आहेत. त्यांनी न्यायालयात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी भिवंडी सत्र न्यायालयात सुनावणी होती. त्यावेळी न्यायालयाने या गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेऊन पवार, पाटील यांचे जामीन अर्ज फेटाळुन लावले. या दोन्ही इसमांवर २२ वर्षाच्या पीडित महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणे, तिला शस्त्राचा धाक दाखविणे, तिला जबरदस्तीने दारू पाजणे या कायद्याने पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पवार डोंबिवलीतच

पडघा पोलिसांची पथके नरेंद्र पवार, शैलेश पाटील यांचा शोध घेत असली तरी नरेंद्र पवार यांचे राजकीय वलय पाहता, ते कल्याण डोंबिवली शहर परिसरात, शिळफाटा फाटा परिसरात आरामात आश्रयाला असल्याची जोरदार चर्चा कल्याण, डोंबिवलीत आहे. नरेंद्र पवार, शैलेश पाटील यांचे मोबाईल बंद येत आहेत. त्यांचे मोबाईल बंद येत असल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात अडथळे येत आहेत.

चौकशी झालीच पाहिजे

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ बुधवारी भिवंडी येथे धामणकर नाका मित्र मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही घटना धक्कादायक आहे. अशी गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत नाही. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करून या गुन्ह्यात तथ्य आढळले तर दोषींवर कठोर कारवाई करावी, असे सांगितले.

पीडित महिलेचा पती सोबत वाद होता. हा वाद मिटविण्यासाठी पीडित महिलेने नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला. नरेंद्र पवार या महिलेशी समाज माध्यमातून संपर्कात होते. घटनेच्या अगोदर एकदा मध्यरात्रीच्या सुमारास पवार यांनी महिलेशी व्हाॅटसप काॅलच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलीस ठाण्यातील तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. पतीसोबतचा वाद मिटविण्यासाठी गेल्या आठवड्यात नरेंद्र पवार यांनी रात्रीच्या वेळेत पीडितेला कल्याणमधील आपल्या वाहनात बसवले. त्यावेळी शैलेश पाटील हे वाहन चालवित होते. ते आपले मित्र असल्याची ओळख पवार यांनी पीडितेला करून दिली होती. आपल्या वाहनात बसून पवार भिवंडीजवळील बापगाव येथील शैलेश पाटील यांच्या शेतघरावर नेले. तेथे तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने पोलीस ठाण्यात केली आहे.

या प्रकरणात आरोपींवर असलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे याप्रकरणात तपास अधिकारी, पीडिता यांचे म्हणणे ऐकावे लागेल. त्याशिवाय या प्रकरणात अटकपू्र्व जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.