ठाणे : ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच परिसरात विकासकामांच्या नावाने मोठय़ा प्रमाणावर खोदकामे सुरू केल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. महापालिकेने तीन हात नाका, देवदयानगर, किसननगर, सावरकरनगर, ढोकाळी, नितीन कंपनी सेवा रस्ता, गोकुळनगर या भागांत रस्ते दुरुस्ती तसेच मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे एकाच वेळी हाती घेत येथील रस्ते अर्धे किंवा पूर्णत: खोदले आहेत. ही सगळी कामे अत्यंत संथगतीने सुरू असून लोकप्रतिनिधी अथवा आयुक्तांच्या आदेशानंतरही या कामांचा वेग वाढत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
ठाणे शहरात पावसाळय़ामध्ये गेल्या वर्षी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वेगवेगळय़ा पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे मोठय़ा प्रमाणावर हाती घेतली आहेत. काही ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. हे करत असताना महापालिकेच्या नियोजनाचा सावळागोंधळ जागोजागी दिसू लागला असून यामुळे एकाच वेळी अनेक महत्त्वाचे रस्ते, मार्ग अंशत: अथवा पूर्णपणे बंद होत असल्याने ती कामे आता आवरा, अशा प्रतिक्रिया आता नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत.
शहरातील तीन हात नाका, देवदया नगर, किसननगर, सावरकरनगर, साठेनगर, ढोकाळी, नितीन कंपनी या भागात मोठय़ा प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहेत. या मार्गावर एकाच वेळी इतक्या मोठय़ा प्रमाणावर खोदकामे सुरू आहेत की नागरिक हैराण झाले आहेत. ही कामे हाती घेत असताना पर्यायी वाहतूक बदल, कामांचा वेग तसेच काही ठिकाणी कामांचा दर्जाही विचारात घेतला जात नसल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
वाहतुकीचे तीनतेरा
• तीन हात नाका चौक ते मॉडेला नाका येथील इटर्निटी मॉलसमोर सध्या रस्त्याची दुरुस्ती सुरू आहे. मुलुंड, भांडुप, वागळे इस्टेटच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. इटर्निटी मॉलसमोरील खोदकामामुळे वाहन चालकांना ज्ञानसाधना महाविद्यालय सेवा रस्ता, मनोरुग्णालय येथून वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहन चालकांचा प्रवास वेळ वाढला आहे.
• देवदयानगर येथेही दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या निवासस्थानापासून एक रस्ता खणण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना मुख्य मार्गावर येण्यासाठी उपवन तलावाचा सुमारे दीड किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. हे काम संथगतीने सुरू आहे.
• सावरकरनगर येथेही कामगार रुग्णालय ते सावरकरनगरच्या दिशेने जाणारा रस्ता खणण्यात आला असून येथील वाहतूक एकेरी मार्गाने होते आहे. या ठिकाणी सायंकाळ होताच मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली असून नितीन कंपनी येथून वागळे इस्टेटच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.
नितीन कंपनी येथील लुईसवाडी, ढोकाळी आणि सावरकरनगर भागांतही अशीच परिस्थिती असून वाहन चालकांना आता प्रवास नकोसा झाला आहे.
रस्ते दुरुस्तीची शहरात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. ती कामे पावसाळय़ापूर्वी संपविण्याचे नियोजन आहे. – प्रशांत सोनग्रा, शहर अभियंता, ठाणे महापालिका.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार