लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : धुळवडीनिमित्त कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात स्थानिक संस्था, नागरिकांनी अनेक उत्सवी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. धुळवडीनिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठा बंद होत्या. रस्तोरस्ती तरूण, तरुणी रंगाची उधळण करत, रंगाच्या पिचकाऱ्या मारत धुळवडीचा आनंद साजरा करत होते.
रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होती. रंगाची उधळण, अचानक अंगावर फेकला जाणारा रंगाचा फुगा, रस्तो रस्ती सुरू असलेले रंग फासण्याचे प्रकार. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद ठेवणे पसंत केले होते. डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहनतळांवर रिक्षांचे तुरळक प्रमाण होते. प्रवाशांना रिक्षेसाठी वाट पाहावी लागत होती. शुक्रवार तिखट वार, त्यात धुळवड. त्यामुळे मटण विक्रीच्या दुकानांवर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर वाढत्या मटण विक्रीमुळे दुपारनंतर या दुकानांसमोरील रांगा कमी झाल्या.
काही उत्साही नागरिक धुळवडीच्या दिवशी भांग, मद्यसेवन करून वाहने चालवितात. त्यामुळे इतरांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती विचारात घेऊन, प्रत्येकाला होळीचा आनंद साजरा करता यावा, कायदा व सुव्यवस्थेचे पालन या कालावधीत व्हावे हा विचार करून कल्याण पोलीस परिमंडळ हद्दीतील आठ पोलीस ठाणे हद्दीत एकूण ९०० पोलिसांचा बंदोबस्त गुरुवारी रात्रीपासून तैनात आहे.
वाहतूक पोलीस मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक भागात प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करत होते. मद्य सेवक करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जात होती. उत्सवाच्या काळात महिलांची टिंगलटवाळी, छेडछाड होऊ नये म्हणून प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत विशेष महिला पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांवर पोलिसांनी ड्रोन, विशेष गस्ती पोलिसांच्या माध्यमातून नजर ठेवली होती. संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात अधिकचा पोलीस बंदोबस्त होता.
लहान मुले, कुटुंबीय सोसायट्यांच्या आवारात गाणी लावून धुळवडीचा आनंद घेत होते. आमदारांनी आपल्या जनसंपर्क कार्यालय, पक्ष कार्यालयांच्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी धुळवडीचे कार्यक्रम आयोजित केले होते. मित्र, मैत्रिणी गटागटाने आपल्या मित्रांवर रंगाची उधळण करण्यासाठी एकमेकांच्या घरी जातानाचे दृश्य होते. सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करून आरडोओरडा करणाऱ्यांना पोलिसांकडून तंबी देण्यात येत होती. जागोजागी पोलीस बंदोबस्त असल्याने उत्सवी नागरिकांनी आरडाओरडा न करता शांतते धुळवडीचा उत्सव साजरा केला.