यंदा केवळ ७० टक्के विक्री

आकांक्षा मोहिते

ठाणे : दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ठाणे शहरातील घंटाळी मंदिर परिसरात ठाणेकर नागरिकांसाठी दिवाळीनिमित्त भव्य ग्राहकपेठ भरविण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते घर सजावटीच्या वस्तू, कपडे, दागिने हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे या ग्राहकपेठेला नागरिकांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळत असतो. यंदाही या ग्राहकपेठेत ७० टक्के वस्तूंची विक्री झाली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

ठाणे शहरात मागील वर्षांनुवर्षांपासून दिवाळीनिमित्त आकाशकंदील प्रदर्शन आणि विक्री, ग्राहकपेठा, वस्तुप्रदर्शन भरविल्या जात असून याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो. करोनामुळे मागील वर्षी या परंपरेत खंड पडल्याचे दिसून आले.

जीवनावश्यक वस्तूंसह, घर सजावटीच्या वस्तू तसेच कपडे, महिलांचे दागिने अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकदेखील या ग्राहकपेठांची आतुरतेने वाट पाहात असतात. दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर यंदा ठाणे शहरातील घंटाळी मंदिर आणि विष्णू नगर परिसरात भव्य ग्राहकपेठांचे आयोजन करण्यात आले आहे.

खणाच्या आणि पैठणी साडय़ांपासून बनवण्यात आलेल्या खास महिलांसाठी बॅग, विविध रंगसंगतीच्या साडय़ा, दुप्पटे, काचेपासून तयार करण्यात आलेल्या पणत्या, समई, खणाच्या साडीपासून तयार करण्यात आलेले आकाशकंदील, बांबूपासून बनवण्यात आलेल्या आकर्षक बॅग, पादत्राणे, शिंपल्यापासून साकारण्यात आलेले सुंदर दागिने, मातीपासून तयार करण्यात आलेल्या विविध सुंदर भांडी, फर्निचर, वारली कलेपासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक वस्तू, घराच्या सजावटीसाठी विविध वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ अशा अनेक वस्तू या वस्तुप्रदर्शन आणि ग्राहकपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यंदाच्या वर्षी खाद्यपदार्थ, दागिने, दिवाळी फराळ खरेदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदा या ग्राहकपेठेत विविध वस्तूंची ७० टक्के विक्री झाली असल्याचे ठाण्यातील भव्य ग्राहकपेठांच्या आयोजिका स्मिता पुरोहित यांनी सांगितले.

ग्राहकपेठांमध्ये विक्रेत्यांचा सहभाग घेण्यास नकार

दरवर्षी ग्राहकपेठांमध्ये सुमारे ६० च्या आसपास दुकाने उभारली जातात. करोना प्रादुर्भावामुळे अनेक दुकानदारांनी ग्राहकपेठांमध्ये सहभाग घेण्यास नकार दिला. त्यामुळे यंदा केवळ ४५ दुकाने उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर दरवर्षी नवीन माल खरेदी केला जात होता. यंदा करोनापूर्वीचा माल बहुतेक दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवला आहे, असे आपली ग्राहकपेठचे आयोजक दिनेश मालुसरे यांनी सांगितले.