अंबरनाथ : अंबरनाथच्या मोरीवली औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कंपनीला शनिवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला कंपनीत काही स्फोट झाले, त्यानंतर ही भीषण आग लागली. स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. असे या रासायनिक कंपनीचे नाव आहे. यावेळी स्फोटामुळे आसपासचा परिसरात हादरे जाणवले सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अंबरनाथ पश्चिम येथील मोरिवली औद्योगिक वसाहतीत स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. ही कंपनी असून यात पोटॅशियम परमॅग्नेट, सोडियम परमॅग्नेट आणि बोरीक ऍसिड पावडर तयार केली जाते. या कंपनीत शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली. रासायनिक कंपनी असल्याने आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाले. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण होते. अंबरनाथसह उल्हासनगर आणि बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन अधिकारी सोनोने यांनी दिली आहे.