उदयोन्मुख छायाचित्रकारांचा भरघोस प्रतिसाद
बदलापूरात एक्स्पोजर छायाचित्र प्रदर्शन व स्पर्धेला शहरातील उदयोन्मुख छायाचित्रकारांचा भरघोस प्रतिसाद लाभला. स्वत: टिपलेल्या छायाचित्रांसाठी अनेकांना पारितोषिकेही मिळाली आहेत. रविवारी येथील श्रीजी आर्केड येथे पार पडलेल्या या स्पर्धा व प्रदर्शनात १६१ छायाचित्रांचा समावेश होता.
बदलापुरात उदयोन्मुख छायाचित्रकारांसाठी होणाऱ्या या एक्स्पोजर या छायाचित्रांवरील स्पर्धा व प्रदर्शनात विविध गटांत छायाचित्रकार सहभागी होतात. या स्पर्धा वाइल्ड लाइफ, व्यक्तिचित्र तसेच नेचर व लॅण्डस्केप अशा तीन गटांत पार पडल्या. यात वाइल्ड लाइफ गटात प्रथमेश घडेकर हा विजेता ठरला आहे. रात्रीच्या आकाशातील आकाशगंगेच्या व चमकत्या ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर वेणुनाग हा साप फांदीवर बसला आहे. या त्याच्या फोटोला विजेतेपद मिळाले. प्रथमेश याने अन्य दोन गटांतसुद्धा पारितोषिक पटकावले आहे. दुपारच्या उन्हात पाणी पिणारा कामगार, रात्रीच्या ढगाळ आकाशाखाली जमिनीवर चमकणारे काजवे तसेच बौद्ध भिक्षू आपल्या पॅगोडाकडे जाताना आदी विविध प्रकारची छायाचित्रे यात सहभागी झाली होती.
डिजिटल एसएलआर प्रकारच्या निकॉन किंवा कॅनन कंपनीच्या कॅमेऱ्यांनी ही छायाचित्रे काढण्यात आली होती. बदलापूर आणि परिसरातील सुमारे १६१ छायाचित्रांचे प्रदर्शन यानिमित्ताने भरले होते. प्रख्यात छायाचित्रकार केदार भट या कार्यक्रमाला उपस्थित होते. गेली तीन वर्षे हा उपक्रम बदलापुरात होत असून या वर्षी छायाचित्र प्रदर्शनाला सुमारे ६०० कलाप्रेमींनी भेट देऊन छायाचित्रांचे कौतुक केले. या वेळी छायाचित्रकार भट यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेता प्रथमेश घडेकर याला २१ हजार रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर, द्वितीय पारितोषिक विजेत्यांना सात हजार रोख व प्रमाणपत्र आणि तृतीय स्थानावरील विजेत्यांना पाच हजार रोख व प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी या प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजक आशीष दामले उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
वाईल्ड लाइफ-प्रथमेश घडेकर, हर्षद झाडे, शशांक राऊळ, व्यक्तिचित्र – अनिकेत थोपटे, सुनील धवले, प्रथमेश घडेकर, नेचर व लँण्डस्केप- प्रतिक प्रधान, शशांक राऊळ, प्रथमेश घडेकर.