कल्याण – कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका रहिवाशाने दोन प्राणीप्रेमींनी सोसायटी आवारातील भटक्या श्वानांचे संगोपन, देखभाल करणे, त्यांना तेथून काढण्यासाठी एकूण १६ हजार रूपयांची खंडणी मागितली, अशी तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यापूर्वी या प्राणीप्रेमींनी या तक्रारदाराविरूध्द भटक्या श्वानांना मारल्याची तक्रार दाखल केली आहे. परस्परविरोधी तक्रारी खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल आहेत.
खडकपाडा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत भटके श्वान आहेत. या भटक्या कुत्र्याने एका महिलेचा आणि तिच्या आईला चावा घेऊन त्यांना जखमी केले. याप्रकरणी सोसायटीतील रहिवाशांनी या भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताविषयी पालिकेकडे तक्रारी किंवा इतर काही हालाचाली सुरू केल्या होत्या. या सगळ्या प्रकारात या सोसायटीच्या आवारात एक भटक्या श्वानाला मारले असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे प्राणी प्रेमी आणि स्थानिक रहिवासी यांच्यात वादावादी सुरू होती.
भटके श्वान, त्यांची पिल्ले याच भागात राहतात. त्यामुळे त्यांना आपण कोठे सोडू शकत नाहीत, अशी भूमिका प्राणीप्रेमींनी घेतली होती. तर या भटक्या श्वानांना सोसायटी आवारातून कायमचे काढायचे असेल तर सोळा हजार रूपये द्यावे लागतील, अशी भूमिका प्राणीप्रेमींनी घेतली होती. हा विषय दिल्लीतील प्राणी मित्र संघटनेपर्यंत गेला होता. प्राणी मित्र संघटनेने भटक्या श्वानाला कुठेही इतरत्र सोडून देता येत नाही. ती आहे त्याच भागात राहू शकतात, अशी भूमिका घेतली होती.
भटक्या श्वानांना आपण बाहेर हाकलू शकत नाहीत. त्यांना खाऊ खालण्यासाठी परवानगी द्या आणि जागा द्या अशी मागणी प्राणीप्रेमीने सोसायटीतील रहिवाशाकडे केली. आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीतर बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर प्राणीप्रेमीनी सोसायटी आवारातील चार भटकी श्वान पकडली. या कारवाईचे या प्राणीप्रेमीने सोसायटीतील रहिवाशाकडून एकूण तीन हजार ४०० रूपये घेतले.
भटक्या श्वानांना येथून काढायचे असेल तर तुम्हाला दर महिन्याला आम्हाला सोळा हजार रूपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली. तुम्ही आपली मागणी पूर्ण केली नाहीत तर तुम्ही श्वानांना त्रास देता म्हणून तुमच्या विरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन आणि तुम्हाला तुरुंगात पाठवीन, अशी धमकी दिली, असे सोसायटीतील रहिवाशाने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस या परस्पर विरोधी गुन्ह्यांचा तपास करत आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), ३०८(२)(३), ३५१(२) कायद्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून पोलीस ठाण्यात सोसायटी आवारातील पाळीव श्वान, भटके श्वानासंबंधीचे गुन्हे वाढत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
