मोहने उदंचन केंद्र येथे पाणी खेचण्यास आणि जलचरांना संचार करण्यास अडथळा ठरणाऱ्या उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सुरूवात केली आहे. तीन महिने हे काम सुरू राहणार असल्याचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. मागील काही वर्षापासून उल्हास नदीत जलपर्णीची वाढ अधिक होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जलपर्णीमुळे मोहने उदंचन केंद्रात पंपाच्या साहाय्याने पाणी खेचणे अवघड जाते. अनेक वेळा जलपर्णी पंपाव्दारे खेचली जाऊन काही वेळा पंप बंद पडण्याची भीती असते. त्यामुळे उदंचन केंद्राजवळ विशेष काळजी घेऊन पाणी खेचण्याची प्रक्रिया प्रशासनाला करावी लागते.
हेही वाचा >>>कल्याण: कोल्हापूरच्या ट्रक चालकाला लुटणारा तडीपार गुंडास कल्याणमध्ये अटक
जलपर्णीमुळे जलचर प्राण्यांना ऑक्सिजनची मात्रा मिळण्यात अडथळे येतात. तसेच जलचरांच्या पाण्यातील संचारावर मर्यादा येतात. त्यामुळे ही जलपर्णी काढून टाकण्यात यावी यासाठी माजी नगरसेवक नितीन निकम हे काही वर्षापासून प्रयत्नशील आहेत. यावेळीही त्यांनी उल्हास नदीतील वाढत्या जलपर्णीविषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती. आयुक्तांनी जलपर्णीची पाहणी केल्यानंतर तातडीने या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. दोन बोटी आणि कामगारांच्या साहाय्याने उल्हास खाडीतील मोहने बंधारा भागातील जलपर्णी काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. उल्हासनगर पालिका उल्हास खाडीतून पाणी उचलते. त्या भागातही पाणी उचलताना पालिकेला अडचण येते. उल्हासनगर पालिकेकडून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले जाते. खाडीच्या वरच्या भागात काढलेली जलपर्णी वाहून मोहने बंधाराच्या दिशेेने येते. मोहने येथे बंधाऱ्याचा अडथळा असल्याने ती या भागात फोफावते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री सभागृहात येताच तोंडाला कुलूप!, ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची भाजपची मागणी पण..
उल्हास नदी लोणावळा भागात उगम पाऊन खोपोली, कर्जत, बदलापूर मार्गे कल्याण जवळून समुद्राला मिळते. बदलापूर, कर्जत पट्ट्यात उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी आढळून येत आहे.
(कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे उल्हास खाडीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.)