पक्षी अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण; पालघर जिल्ह्यत पक्ष्याच्या तुरळक नोंदी

वसई : केरळ राज्यात आणि महाराष्ट्रात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळून येणाऱ्या ऑरेंज ब्रेस्टेड पिजन (तांबडय़ा छातीचा हरिअल) या पक्ष्याचे डहाणू तालुक्यातील वाढवण येथे पक्षीनिरीक्षकांना दर्शन झाले. पालघर जिल्ह्य़ात या पक्ष्याच्या नोंदी तुरळक आहेत, असे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.

पालघर जिल्ह्य़ाला भरभरून पक्षीवैभव लाभले आहे. समुद्रकिनारे, खारफुटीचा प्रदेश, मिठागरे, भातशेती, जंगल इत्यादी भागांत विविध पक्षी पाहावयास मिळतात. मात्र जिल्ह्य़ात दुर्मीळ असलेल्या ‘तांबडय़ा छातीचा हरिअल’ पक्ष्याचे दर्शन वाढवण येथे झाले आहे. जिल्ह्य़ातील पक्षीअभ्यासक निरीक्षणासाठी वाढवण समुद्रकिनाऱ्यावर गेले असता त्यांना ८ ते १० ‘तांबडय़ा छातीचे हरिअल’ पक्षी आपल्या घरटय़ासह आढळून आले. पालघर जिल्ह्यात मुख्यत: ‘यलो फुटेड ग्रीन पिजन’ आढळतो. हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. मात्र त्यामानाने ‘तांबडय़ा छातीचा हरिअल’ या पक्ष्याची कमी नोंद असल्याचे पक्षीअभ्यासक सचिन मेन यांनी सांगितले. केरळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत किनारपट्टी भागात हा पक्षी मुख्यत: आढळतो. मात्र पालघर जिल्ह्य़ात त्याचे दर्शन झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पक्षीनिरीक्षक भावेश बाबरे, आशीष बाबरे, शैलेश आमरे, सिद्धांत चुरी आणि प्रवीण बाबरे यांना हा पक्षी निदर्शनास आला असून त्यांनी सतत त्यांचे निरीक्षण केले. हा पक्षी फलाहारी असून त्यांच्या विणीच्या नोंदी क्वचितच आहेत. मात्र वाढवण येथे त्याचे घरटे आढळून आले असून त्यांची पिल्लेही निदर्शनास आली आहेत. मुख्यत: पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या पक्ष्यांची घरटी बांधायला सुरुवात होते.

पालघर जिल्ह्य़ाला मुबलक पक्षीवैभव लाभले आहे. जिल्ह्य़ातील पक्ष्यांचे व्यापक सर्वेक्षण होण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या अधिक नोंदी नागरिकांसमोर आणता येतील.

– सचिन मेन, पक्षी अभ्यासक