scorecardresearch

भोंदूबाबाच्या कारनाम्याने पोलीसही चक्रावले! यूट्यूबवरून लोकांना घालायचा गंडा, चॅनलला लाखो सबस्क्रायबर्स!

ठाण्यात ९ वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बाबाला अटक करण्यात आली आहे.

भोंदूबाबाच्या कारनाम्याने पोलीसही चक्रावले! यूट्यूबवरून लोकांना घालायचा गंडा, चॅनलला लाखो सबस्क्रायबर्स!
कुलदीप निकमच्या यूट्यूब चॅनलवरील स्क्रीनशॉट

भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कुलदीप निकम या भोंदूबाबाच्या युट्यूब चॅनेलवर सुमारे अडीच लाख सदस्य (सबस्क्रायबर) असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भूतबाधा उतरविणे, जादूटोना करण्याच्या नावाने त्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळले असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चित्रफीत तयार करण्यासाठी लागणारे ३२ कॅमेरे, महागडे लॅपटॉप, मोबाईल, ड्रोन कॅमेरे, भूत शोध यंत्र, प्राण्यांचे दात, सापाची कात तसेच तंत्रविद्येची पुस्तके जप्त केली आहेत.

चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार

घोडबंदर येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुलदीप निकम या भोंदूबाबाने साथीदार किशोर नवले आणि स्नेहा शिंदे यांच्या मदतीने नऊ वर्षीय भाच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी १३ मार्चला मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड आणि साहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू करून तिघांनाही अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, पैसे कमवण्यासाठी तसेच नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्यांनी दत्तप्रबोधिनी पब्लिकेशन आणि पॅरानॉर्मल रेस्क्युअर सोसायटी या नावाने युट्यूब चॅनल सुरू केल्याचेही तपासात समोर आले.

यूट्यूब चॅनलला लाखो सबस्क्रायबर्स

यातील दत्तप्रबोधिनी पब्लिकेशन या वाहिनीवर १ लाख १६ हजारहून अधिकजण सदस्य आहेत. तर पॅरानॉर्मल रेस्क्युअर सोसायटी या वाहिनीवर १ लाख ६४ हजार सदस्य आहेत. या वाहिन्यांच्या माध्यमातून जादूटोना करणे, भूतबाधा उतरविणे अशा विविध विषयांवर चित्रफिती प्रसारित केल्या आहेत. या चित्रफिती पाहून अनेकजण त्यांच्या समस्या कुलदीपकडे सांगत असल्याचे चित्रफितीमधील प्रतिक्रियेवरून कळत आहे. कुलदीपची चौकशी केली असता, समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाकडून तो पहिल्या भेटीसाठी ३० हजार रुपये उकळत होता. त्यानंतर त्या व्यक्तीस इतर विधीचे कारण देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये घेत होता.

या माध्यमातून हजारो नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा संशय पोलिसांना असून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी या आरोपींच्या घरी झडती घेतली असता, चित्रफिती तयार करण्यासाठी लागणारे ३२ अत्याधुनिक कॅमेरे, ड्रोन, लॅपटॉप, प्राण्यांचे दात, काळ्या बाहुल्या, भूत शोध यंत्र, तांत्रिक पुस्तके, कावळ्याचे पंख असे साहित्य आढळून आले आहे.

याप्रकरणात पोलिसांनी कुलदीप याची साथीदार स्नेहा शिंदे हिला अटक केली आहे. स्नेहाने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुशिक्षित असतानाही तिने हा प्रकार केल्याने पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2022 at 19:27 IST

संबंधित बातम्या