अमेरिकी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मीरा रोड भागातील तीन बोगस कॉलसेंटरवरील कारवाईनंतर मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई परिसरातही अशा प्रकारची कॉलसेंटर सुरू होती. मात्र, मीरा रोडच्या कारवाईनंतर अशा कॉलसेंटरचे चालक धास्तवाले असून त्यांनी कारवाईच्या भीतीने कॉलसेंटर बंद केल्याची माहिती ठाणे पोलिसांपर्यंत आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात ठाणे पोलिसांकडून मात्र अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तसेच गुजरात राज्यातील अहमदाबाद पोलिसांनाही कारवाई करायची असल्याने त्यांनी ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून मीरा रोडमधील कारवाईची माहिती घेतली.

मीरा रोड परिसरातील हरिओम आय.टी.पार्क, युनिवर्सल आऊट सोर्सिग सवर्ि्हसेस आणि ओसवाल हाऊस या तीन ठिकाणी हे कॉलसेंटर चालविण्यात येत होते. या तिन्ही बोगस कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकी नागरिकांना आयआरएस विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याची बाब ठाणे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाली होती. या कारवाईत ७२ जणांना अटक करण्यात आली. या सर्वाना गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना १० ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिन्ही कॉलसेंटरची शंभर कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.