ठाणे : डिजीटल अटक, शेअर बाजार अशी विविध कारणे सांगून सायबर फसवणूक करणारे नागरिकांची फसवणूक करत असतात. परंतु आता त्यापेक्षाही विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. डाॅक्टर असल्याचा बहाणा करुन एका व्यक्तीने गतिमंद मुलाला बरे होण्यासाठी कीट पाठवितो असे सांगून त्याच्या आईची तब्बल ६ लाख ४४ हजार १४६ रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. महिला घरकाम करत असून या फसवणूक प्रकरणी ठाणे ग्रामीण येथील वाशिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणूक झालेली महिला शहापूर तालुक्यातील वाशिंद भागात वास्तव्यास आहे. ती पती, मुलगा आणि सासऱ्यांसह एकत्र कुटुंबात राहते. त्यांचा मुलगा गतिमंद असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्या इस्टाग्राम खात्यावरुन आजाराबाबत माहिती घेत असताना १० मार्चला त्यांना डाॅ. खान नावाने रिक्वेस्ट प्राप्त झाली. त्यांनी ती रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्या व्यक्तीने मुलाच्या आजारपणाबाबत विचारले. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेचा व्हाॅट्सॲप क्रमांक मागितला. महिलेने त्या व्यक्तीला इन्स्टाग्राममधील संदेशाद्वारे तिचा व्हाॅट्सॲप क्रमांक पाठविला.
अशी झाली फसवणूक
डाॅक्टर असल्याचा बहाण करुन त्या व्यक्तीने मुलाच्या आजारासंदर्भातील एक कीट कुरिअरने पाठविणार असल्याचे महिलेला सांगितले. १३ मार्चला त्या व्यक्तीने काॅल करुन महिलेला सांगितले की, कुरिअर विमानतळावर अडकले आहे, १६ हजार १५० रुपये भरा. त्या व्यक्तीने दिलेल्या एका बँक खात्यावर महिलेने तात्काळ पैसे भरले. त्या व्यक्तीने १३ ते १७ मार्च या कालावधीत वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून ऑनलाईनरित्या ४ लाख ४४ हजार १४६ रुपये उकळले.
कीट घरी पोहचले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने तात्काळ वाशिंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६७ आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम ३१८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
