डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत राहत असलेल्या एका नोकरदार तरूणाची आर्थिक व्यवहाराची सर्व कागदपत्रे वापरून एका अज्ञात इसमाने नऊ वर्षापूर्वी एक बनावट कंपनी स्थापन केली. या तरूणाच्या कागदपत्रांच्या आधारे आर्थिक व्यवहार केले. या तरूणाला या बनावट कंपनीच्या माध्यमातून आयकर विभागाकडून दोन कोटी ९० लाख सहा हजार १३६ रूपये आयकर भरणा करण्याची नोटीस आली. त्यावेळी या फसवणूक प्रकरणाचा उलगडा तरूणाला झाला.

या फसवणूक प्रकरणी नोकरदार तरूणाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार केली. २८ वर्षाचा हा नोकरदार तरूण डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील जयहिंद काॅलनी भागात राहतो. जुलै २०१७ ते मार्च २०२४ या कालावधीत हा बनावट कागदपत्रे वापरण्याचा प्रकार घडला आहे.विष्णुनगर पोलीस ठाण्यात तरूणाने दाखल केलेल्या तक्रारीतील माहिती आणि तरूणाने दिलेली माहिती अशी, की जुलै २०१७ ते मार्च २०२४ या कालावधीत अज्ञात इसमाने आपल्या व्यक्तिगत, आर्थिक व्यवहाराशी संबंधित आधारकार्ड, पॅनकार्ड कागदपत्रांचा आपणास कोणतीही पूर्वकल्पना न देता वापर केला. या कागदपत्रांच्या आधारे इसमाने आपल्या नावाचा वापर करून रोज टेर्डर्स नावाची कंपनी स्थापन कली. या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार केले. हे व्यवहार करत असताना संबंधित अज्ञात इसमाने आयकर विभागाची व्यहारांवरील रक्कम भरणे आवश्यक होते. ती रक्कम त्या इसमाने आयकर विभागाकडे भरणा केली नाही.

हे सर्व व्यवहार ऑनलाईन माध्यमातून अज्ञात इसमाने केले होते. या कोणत्याही व्यवहाराची माहिती तक्रारदार तरूणाला नव्हती. रोज ट्रेडर्स नावाची कंपनी आयकर चुकवत असल्याचे निदर्शनास आल्यावर आणि ही रक्कम कोटीच्या घरात गेली होती. डोंबिवलीतील तरूणाचा पत्ता रोज ट्रेडर्सने कंपनी चालविणाऱ्या इसमाने वापरला होता. त्यामुळे आयकर विभागाने रोज ट्रेडर्स कंपनीचे कागदोपत्री व्यवहारांवरून डोंंबिवलीतील तरूणाला आयकर विभागाने सन २०२२ मध्ये रोज ट्रेडर्स कंपनीने आर्थिक व्यवहार केलेल्या, पण या व्यवहारांवरील दोन कोटी ९० लाख सहा हजार १३६ रूपयांची आयकराची रक्कम भरणा न केल्याने तक्रारदार तरूणाला ही रक्कम भरणा करण्यासाठी नोटीस पाठवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तरूणाला तीन वर्षापूर्वी ही नोटीस मिळताच तक्रारदार तरूण हडबडून गेला. आपण कधीही राज ट्रेडर्स नावाची कंपनी स्थापन केली नाही. त्या माध्यमातून व्यवहार केले नाहीत तरीही आपणास आयकर विभागाची नोटीस आल्याने तरूणाचे कुटुंब हादरले. तक्रारदाराने तरूणाने आयकर विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी त्या तरूणाला आपल्या व्यक्तिगत कागदपत्रांचा वापर करून अज्ञात इसमाने एक कंपनी स्थापन केली आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले आहेत, असे निदर्शनास आले. या तरूणाने आयकर विभागाला सर्व प्रकारची माहिती दिली. या प्रकाराची सर्व स्पष्टीकरणे तक्रारदार तरूणाने आयकर विभागाला दिली. त्यानंतर तरूणाने आपल्या कागदपत्रांचा वापर करून अज्ञात इसमाने बनावट कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केले आहेत, अशी तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात बुधवारी केली. उपनिरीक्षक कुमटकर तपास करत आहेत.