गेल्या दोन वर्षांत लावलेल्या झाडांची पालिकेकडे माहिती नाही; यंदा सव्वा दोन लाख झाडे लावण्याचा मानस

वसई-विरार महापालिका यंदा पावसाळय़ात तब्बल सव्वा दोन लाख झाडे लावणार आहेत. याच महापालिकेने गेल्या दोन वर्षांत दोन लाख ९८ हजार ४१४ झाडे लावली, त्यासाठी १० कोटींचा निधी खर्च केला. मात्र या झाडांचे पुढे काय झाले हेच पालिकेला ठावूक नाही. ही झाडे जगली की मृत झाली हा प्रश्न अनुत्तरित असताना यंदा नव्याने झाडे लावण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. त्याशिवाय गेल्या वर्षी लावलेल्या ४९ हजार झाडांपैकी ७७ टक्के झाडांच्या संरक्षक जाळी बेपत्ता असल्याचेही उघडकीस आले आहे.

वसई-विरार महापालिकेले गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक प्रभागात पालिकेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठय़ा थाटामाटात सादर करून त्याला प्रसिद्धी दिली जाते. मात्र गेल्या वर्षीच्या झाडांचे काय झाले त्याबाबत पालिकेकडे ठोस माहिती नाही. २०१५ ते २०१७ या कालावधीत नऊ  प्रभागात २ लाख ९८ हजार ४१४ झाडे लावली आहेत. या झाडांसाठी पालिकेने १० कोटी ९३ लाख ६८ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. या झाडांचे पुढे काय झाले, ती जगली का हे प्रश्न अनुत्तरीत आहे. पालिकेने लावलेल्या झाडांना टॅग लावले जातात. मात्र पालिकेने खाजगी स्वयंसेवी संस्थांनी लावेल्या झाडांनाही आपले टॅग लावून ही आपली झाडे असल्याचे भासवले होते. झाडांच्या संवर्धनासाठी पालिका ठेका देते. त्यात झाडांना पाणी घालण्याचा ठेका दिलेला असतो. मात्र या पाण्याचाही गैरवापर होतो आणि या प्रकणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वसई पर्यावरण संवर्धक समितीचे निमंत्रक समीर वर्तक यांनी केला आहे.

संरक्षक जाळीप्रकरणी अद्याप कारवाई नाही

गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या ४९ हजार झाडांपैकी ७७ टक्के झाडांच्या संरक्षक जाळय़ा बेपत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाकडून मिळालेल्या माहितीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी केली असता पालिकेने सांगितलेली संरक्षक जाळय़ांची संख्या आणि प्रत्यक्षात जागेवर आढळून आलेल्या जाळय़ा यामध्ये मोठी तफावत आहे. ठेकेदार मे. हिरावती एंटरप्रायजेस या ठेकेदारास हा ठेका देण्यात आला होता. त्यांना १० कोटी ९३ लाख ६८ हजार रकमेची देयके अदा करण्यात आली आहेत. मात्र अनेक झाडे ही संरक्षक जाळी नसल्याने मृत झाली होती. अनेक झाडांच्या बाजूला जाळय़ा उन्मळून पडल्या आहेत, तर काही जाळय़ा मोडकळीस आल्या होत्या, असा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकरणी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या, पंरतु अद्याप कुठलीच कारवाई झालेली नसल्याचे शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी सांगितले.