ठाणे – जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी नुकतेच मुंबई मध्ये येऊन गेले. मात्र याच पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर एक खोटी आणि बनावट माहिती वेगाने पसरवली जात आहे.

जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केल्याचे काही फोटो सध्या विविध माध्यमांवर प्रसारित होत आहेत. हे फोटो खरे असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात हे सर्व फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी पश्चिम बंगाल येथून केली. तेथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर मेस्सी यांनी मुंबईला भेट दिली. वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. क्रीडाविश्वातील या दिग्गजाच्या भारत भेटीने सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली.

याच पार्श्वभूमीवर मेस्सी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केल्याचे काही फोटो सध्या विविध माध्यमांवर प्रसारित होत आहेत. या प्रकरणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी अधिकृत निवेदन जारी करून महत्त्वाची माहिती दिली आहे.

डीजीआयपीआरच्या माहितीनुसार, सध्या प्रसारित होत असलेले हे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय )तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आले असून, त्यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी या फोटोंवर किंवा त्यासोबत दिल्या जाणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.

लिओनेल मेस्सी यांच्या भारत दौऱ्याला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसून आला. पश्चिम बंगालपासून ते महाराष्ट्रापर्यंत मेस्सीच्या उपस्थितीने क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. पश्चिम बंगाल असो वा मुंबई, प्रत्येक ठिकाणी चाहत्यांची गर्दी, बॅनर्स, पोस्टर्स, मेस्सीचे जर्सी परिधान केलेले चाहते आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

वानखेडे स्टेडियममधील कार्यक्रमात तर हजारो चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. भारतातील तरुणांमध्ये आणि फुटबॉलप्रेमींमध्ये मेस्सीची लोकप्रियता मोठी आहे. विविध क्रीडा संस्था, आयोजक, तसेच चाहत्यांकडून मेस्सी चे स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावरही मेस्सीच्या भारत दौऱ्याचे फोटो, व्हिडीओ आणि प्रतिक्रियांचा पूर आला असून, #MessiInIndia हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.

या पार्श्वभूमीवर मेस्सीच्या प्रत्येक हालचालीकडे देशाचे लक्ष लागले असताना, त्यांच्या नावाने बनावट व खोटे फोटो प्रसारित करण्यात आले आहे. याबाबत डीजीआयपीआरने सोशल मीडियावर पसरवली जाणारी खोटी, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज असल्याचेही नमूद केले आहे.