ठाणे महापालिकेतील सुमारे ५० च्या आसपास अधिकारी आणि कर्मचारी करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडले असून त्यातील ४० हून अधिक जणांना केंद्र शासनाने जाहीर केलेल्या विमा कवचांतर्गत अद्याप ५० लाख रुपये मिळू शकलेली नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांचा विमा कवच योजनेंत समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव पालिकेला राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्यासाठी मुदत ठरवून दिली होती. या मुदतीत पालिकेकडून प्रस्ताव पाठविण्यात आलेले नसल्यामुळेच त्यांचे कुटूंबिय विमा कवचापासून वंचित असल्याची माहिती मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच स्पष्टीकरण देऊ असे स्पष्ट केले आहे.

देशात, राज्यात आणि ठाणे महापालिका क्षेत्रात दोन वर्षांपुर्वी करोनाचा संसर्ग सुरु झाला. या संसर्गानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली. करोनावर उपचार उपलब्ध नसल्याने आणि रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण होते. एक रुग्ण १५ ते २० जणांना बाधित करत होता. अशा परिस्थितीत शासकीय अधिकारी, खासगी आणि शासकीय वैद्यकीय अधिकारी जीव धोक्यात घालून रुग्ण उपचार करीत होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात शासकीय तसेच पालिका अधिकाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली असून हे कर्तव्य पार पाडताना अनेक अधिकारी व कर्मचारी मृत पावले. या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने आरोग्य कवच विमा जाहिर केली होती. या योजनेत करोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांची रक्कम देण्याचे घोषित करण्यात आले होते. या योजनेसाठी संबंधित शासकीय यंत्रणांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने केले होते. प्रस्ताव पाठविण्यासाठी ३० मार्च २०२० ते ३० जून २०२० असा कालावधीत देण्यात आला होता. त्यास मुदत वाढ देऊन ही मुदत २५ सप्टेंबर २०२० पर्यंत करण्यात आली. त्यानंतर १८० दिवसांची चार वेळा मुदत वाढ देऊन १८ एप्रिल २०२२ पर्यंत प्रस्ताव पाठविण्यास अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत पालिकेकडून प्रस्ताव पाठविण्यात आलेले नसल्यामुळेच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवचापासून वंचित असल्याची माहिती मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. भीमराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊनच स्पष्टीकरण देऊ अशी प्रतिक्रीया दिली.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान घराच्या बाहेर कोणी पडत नव्हते, त्या वेळेस ठाणे महापालिकेचे सर्व कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत होते. हे कर्तव्य बजावताना ठाणे महापालिकेतील ५० च्या आसपास अधिकारी आणि कर्मचारी मृत पावले. या सर्वांच्या कुटूंबियांना विमा कवचाअंतर्गत ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव पाठविण्याची सुचना पालिकेला केली होती. परंतु पालिकेने ठरवून दिलेल्या मुदतीत प्रस्ताव पाठविले नसल्यामुळे ४० हून अधिक मृत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विम्याचे पैसे मिळू शकलेले नाहीत, अशी माहिती मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. दरम्यान, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे पालिकेने संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवचांतर्गत पैसे देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी ६ जणांच्या कुटूंबियांना विमा कवचाचे पैसे मिळाल्याचा दावा यापुर्वी पालिका प्रशासाने केला होता. तर, उर्वरित प्रस्तावातील त्रुटी दुर करण्याचे काम सुरु असल्याचेही सांगितले. प्रत्यक्षात मात्र मुदतीत प्रस्ताव पाठविले नसल्यामुळे ही मदत मिळणार नसल्याचे समजते. तसेच ठाणे महापालिकेनी स्वतः कोणत्याही प्रकारची भरपाई किंवा मदत नाही दिली. परंतु सरकारने देऊ केलेली मदत देखील मिळवून देऊ शकली नाही, अशी प्रतिक्रीयाही नातेवाईकांनी दिली आहे.