scorecardresearch

सहजसफर : उद्यानात साहित्य नजराणा!

उद्यान म्हणजे काय?.. रम्य हिरवळ, थुईथुई नाचणारी कारंजी, जिथे लहान बालके बागडतात, प्रेमीयुगूल प्रेमगुंजन करतात अन् आजी-आजोबा सायंकाळी फेरफटका मारतात. एखाद्या बगिच्याचे वर्णन यापेक्षा अधिक करता येणार नाही. पण अंबरनाथमधील एक बगिचा मात्र केवळ हिरवाई जोपासत नाही, तर आपल्याला साहित्यिक …

सहजसफर : उद्यानात साहित्य नजराणा!

tn13उद्यान म्हणजे काय?.. रम्य हिरवळ, थुईथुई नाचणारी कारंजी, जिथे लहान बालके बागडतात, प्रेमीयुगूल प्रेमगुंजन करतात अन् आजी-आजोबा सायंकाळी फेरफटका मारतात. एखाद्या बगिच्याचे वर्णन यापेक्षा अधिक करता येणार नाही. पण अंबरनाथमधील एक बगिचा मात्र केवळ हिरवाई जोपासत नाही, तर आपल्याला साहित्यिक माहितीही देतो. मायमराठीतील अभिजात साहित्यिकांच्या माहितीचा नजराणाच येथे पाहायला मिळतो.
अंबरनाथ स्थानकापासून प्राचीन शिवमंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हुतात्मा चौक लागतो. या चौकाच्या एका बाजूला हे साहित्य उद्यान आहे. उद्यानाचे नाव आहे, ‘पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यान.’ गेल्या महिन्यात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्तेच या उद्यानाचे उद्घाटन झाले. कल्पकता, योजकता यांचा सुरेख मिलाफ साधत हे उद्यान साकार केलेले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या एका फाटकावर आपल्याला दासबोधमधील ‘कवि देवांचे रूपकर्ते’ या काव्यपंक्ती तर दुसऱ्या बाजूला बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘काळय़ावरती जरा पांढरे’ या काव्यपंक्ती दिसतील. या काव्यमय स्वागतानंतर आपण आतमध्ये प्रवेश केल्यास मराठी साहित्यातील असंख्य tn12साहित्यिकांच्या काव्यपंक्ती, त्यांची थोडक्यात माहिती, त्यांची साहित्य संपदा आदी माहिती जागोजागी दिसते. तब्बल ८८ दिवंगत साहित्यिकांवरील लेखनांश व माहिती या उद्यानात पाहायला मिळते. त्यात आचार्य अत्रे यांच्यापासून पु. ल. देशपांडे, शांता शेळके यांच्यापासून जी. ए. कुलकर्णी, भाऊ पाध्ये यांच्यापासून अरुण कोलटकर यांच्यापर्यंत अनेक साहित्यिकांची सविस्तर माहिती या उद्यानात विषद केली आहे.
उद्यानाच्या एका कोपऱ्यात बालसाहित्य कट्टा उभारण्यात आला आहे. या कट्टय़ावर बालकविता पाहायला मिळतात, तर एका कोपऱ्यात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. स्वातंत्र्य लढा व सामाजिक चळवळीशी संबंध असलेल्या साहित्यिकांच्या १२ काव्यपंक्ती आहेत. सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, वामनदादा कर्डक, नारायण सुर्वे यांच्या काव्यरचना येथे तुम्हाला वाचायला मिळतील.
या उद्यानाच्या कपाऊंडला सात खांब असून, या प्रत्येक खांबावर बाहेरच्या बाजूस मराठी वाङ्मयात मोलाची भर घालणाऱ्या संत साहित्यिकांची माहिती आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतरत्न व ज्ञानपीठ मिळविणाऱ्या मराठी साहित्यिकांची माहिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भाषणाचा अंश येथे पाहायला मिळतो. उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील भिंतीवर प्रबोधनकार ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांची दोन मोठी तैलचित्रे आहेत. प्रबोधनकारांच्या तैलचित्राच्या बाजूला त्यांची माहिती, साहित्य संपदा आदी आहे, तर बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या बाजूला त्यांची गाजलेली दोन व्यंगचित्रे आहेत.
तब्बल सहा हजार चौरस फूट क्षेत्रात हा साहित्यिक नजराणा उभारण्यात आला आहे. पूर्वी ही जागा पडीक होती. तिथे मराठी साहित्यासंबंधित उद्यान उभारण्यात यावे, अशी भन्नाट अंबरनाथमध्ये राहणारे कवी-लेखक किरण येले यांच्या डोक्यात आली आणि त्यातून हे उद्यान साकारण्यात आले. लहान मुलांना साहित्याची गोडी लागावी, आजच्या तरुणाईला मराठी साहित्यिकांविषयी माहिती मिळावी यासाठी हे उद्यान उपयुक्त आहे. साहित्यप्रेमींनी तर आवर्जून भेट द्यावी, असे हे उद्यान आहे. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात फेरफटका मारायला जात असाला, तर या साहित्य उद्यानात नक्कीच सहजसफर करा!
संदीप नलावडे

साहित्य उद्यान, अंबरनाथ
कसे जाल?
* अंबरनाथ स्थानकापासून चालत १५ मिनिटांवर हे उद्यान आहे. शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुतात्मा चौक लागेल. या चौकाच्या एका बाजूलाच साहित्य उद्यान.
* स्थानकापासून रिक्षानेही जाता येईल.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2015 at 12:13 IST

संबंधित बातम्या