सकाळी जाग आली की पहिल्यांदा कसली गरज असते तर ती चहाची. वाफाळता चहा नजरेसमोर आला की एकदम तरतरी येते. सध्या थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाल्याने गरमागरम चहाचे घुटके घेण्याची मजा काही औरच असते. चहाला राष्ट्रीय पेय जाहीर केले ते उगीच नाही. कवींनी तर चहाला अमृताची उपमा दिली आहे. मेंदूला तरतरी देणाऱ्या या ‘अमृततुल्य’ पेयाचे महत्त्वच काही और आहे. मात्र आपल्याला आल्याचा चहा, मसाला चहा, ग्रीन टी हेच चहाचे प्रकार माहीत आहेत. मात्र मीरा रोडच्या ‘चाय शाय’मध्ये विविध प्रकारचे चहा मिळतात. दालचिनी चहा, बदाम केशर चहा, काळी मिरी चहा, हिरवी मिरची चहा या वैशिष्टय़पूर्ण चहाबरोबरच बर्फाळलेला चहा, काला खट्टा चहा, जिंजर लेमन चहा चहाप्रेमींची ‘तृष्णा’ भागवतो.

नरेश जांगिड आणि अवधेश मिश्रा या युवकांनी चहावर निरनिराळे प्रयोग करून चहाप्रेमींसाठी सादर केले आहेत. चहाच्या वेगवेगळ्या चवी येथे चाखायला मिळतात. पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या चहा आणि मसाला चहासोबतच इलायची चाय, अद्रकवाली चाय, अद्रक लवंग चाय आदी चहा या ठिकाणी मिळतात. या चहामध्ये वेलची, आले आणि लवंगाचा वापर केला जातो. इतकेच नव्हे तर सिनेमन मसाला म्हणजेच दालचिनी पावडर, जिंजर सौफ म्हणजेच आलं आणि बडीशेप यांचा वापर केलेला चहा तसेच सौफ विथ ट्विस्ट म्हणजेच बडीशेप सोबतच ग्राहकाच्या पसंतीनुसार काळीमिरी, लवंग, दालचिनी किंवा वेलची यापैकी एका मसाल्याच्या पदार्थाचा वापर करून तयार केलेला चहा हा चहा तयार केला जातो.

झणझणीत पदार्थ खाण्याची सवय असलेल्यांना चहाही झणझणीत हवा असेल तर त्यांनी ‘चाय शाय’मध्ये नक्कीच जायला हवे. कारण येथे हिरव्या मिरचीचा वापर करून तयार केलेला तिखट चवीचा झणझणीत चहा मिळतो. तरतरी येण्यासाठी काही जण कडक कॉफी पीत असतात हीच संकल्पना वापरून ‘चाय शाय’मध्ये खडी चाय अर्थात कडक चहाही बनवला जातो.

चहा म्हटला की तो वाफाळता, गरमागरम घुटके घशाखाली उतरवणाराच असावा ही संकल्पना आता मागे पडली आहे. कोल्ड कॉफी सर्वानाच सुपरिचित आहे. ‘चाय शाय’मध्ये आता आइस्ड टी म्हणजेच बर्फाळलेला चहादेखील उपलब्ध आहे. बर्फाचे तुकडे घातलेला इलायची, सौफ, लेमन, काला खट्टा, जिंजर लेमन आणि आम पापड अर्थात आंब्याच्या पोळीचे तुकडे अशा विविध चवींच्या ‘आइस्ड टी’ची चवदेखील आवर्जून घ्यावी अशीच आहे.

आरोग्याची काळजी घेणाऱ्यांची खबरदारीही ‘चाय शाय’ने घेतली आहे. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे ‘ग्रीन टी’ही या ठिकाणी उपलब्ध आहेत. यात ब्लॅक टी विथ लेमन, काश्मिरी कहावा, ग्रीन टी विथ लेमन, ग्रीन टी विथ मिंट म्हणजेच पुदिना, ग्रीन टी विथ रोजमेरी आणि ऑरगॅनिक तुलसी टी अशा आरोग्यवर्धक चहाच्या प्रकारांचा समावेश आहे.

फक्त चहाच पिणाऱ्यांची अनेकांना सवय असली तरी चहा सोबतच नाष्टा करणेही अनेकांना आवडते. त्यामुळेच ‘चाय शाय’मध्ये चहासोबत बन मस्का, मॅगी सँडवीच, मॅगी भेळ उपलब्ध आहेत. एरवी फक्त नुडल्स खाणाऱ्यांना ‘मॅगी सँडवीच’सारखा या ठिकाणी मिळणारा आगळावेगळा पदार्थही चाखायला हवा.

चाय शाय

* पत्ता : २४, २५, वासुदेव स्काय हाय, भैरव रेसिडेन्सीसमोर, कनाकिया रोड, मीरा रोड (पूर्व)

* वेळ : सकाळी ८ ते रात्री ११