सावरकरनगर येथे रस्त्याच्या कामामुळे मनमानी; ठाण्यात आरटीओला संघटनांच्या वाकुल्या

ठाणे : करोना काळात ठाण्यातील रिक्षाचालकांनी शेअर प्रवासासाठी केलेली दरवाढ निर्बंध शिथिल झाले तरी कायम ठेवण्याची मनमानी राजरोसपणे सुरू आहे. ठाण्यातील सावरकरनगर येथे सुरू झालेल्या रस्त्याच्या कामामुळे रिक्षा चालकांनी स्वयंघोषित दरवाढ केल्याने प्रवासांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

वागळे इस्टेट येथील सावरकरनगर भागातील रस्त्यावरील धोकादायक कल्व्हर्टच्या पुनर्बाधणीचे काम महापालिकेने मंगळवारपासून हाती घेतले. काही दिवसांपूर्वी येथील रस्ता खचला होता. या कामामुळे सावरकरहून यशोधननगर येथे जाणारा मार्ग प्रवासासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. परिणामी, सर्व वाहनांना इंदिरा नगरमार्गे किंवा कॅडबरी जंक्शनमार्गे स्थानक परिसराकडे प्रवास करावा लागत आहे. मोठा वळसा घालून यावा लागत असल्याने लोकमान्य नगर तसेच यशोधन नगर मार्गावरील शेअर रिक्षाचालकांनी शेअर भाडे दरात वाढ केली आहे. ही भाववाढ करताना आरटीओ अथवा संबंधित यंत्रणांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. वळसा घालावा लागत असल्यामुळे आमचे नुकसान होते. त्यामुळे भाववाढी शिवाय पर्याय नाही असे कारण यामागे दिले जात आहे. या प्रकाराला कायदेशीर आधार कोणता, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. या मार्गावरून लोकमान्यनगर डेपोच्या दिशेस येजा करणाऱ्या टीएमटी बसही इंदिरानगर मार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सावरकरनगर तसेच यशोधननगरच्या प्रवाशांना बस पकडण्यासाठी पायपीट करत लोकमान्यनगर बस डेपो गाठावा लागत आहे. 

लोकमान्यनगर, यशोधननगर, इंदिरानगर, सावरकरनगर या भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा कामगार रुग्णालयाजवळील नाल्यावरील रस्ता काही दिवसांपूर्वी खचला. या मार्गाचे काम तात्काळ महापालिकेने सुरू केले होते. या रस्त्यावरील कल्व्हर्ट धोकादायक झाल्यामुळे पुनर्बाधणीचे काम महापालिकेने हाती घेतले. त्यामुळे सावरकरहून यशोधनकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील सर्व वाहनांना इंदिरानगर किंवा कॅडबरी जंक्शनमार्गे प्रवास करावा लागत आहे. या भागातून स्थानक परिसराकडे जाणाऱ्या शेअरिंग रिक्षा चालकांनाही मोठा वळसा घेऊन ठाणे स्थानक गाठावे लागत असल्यामुळे त्यांनी शेअर रिक्षाच्या भाडे दरात वाढ केली आहे. ही दरवाढ स्वंयघोषित असून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत वाढीव दर आकरण्यात येतील असे रिक्षा चालकांकडून सांगण्यात येत आहे. यशोधननगर ते ठाणे स्थानक या मार्गावर पाच रुपये दरवाढ झाली असून सध्या प्रतिप्रवासी २५ रुपये आकारले जात आहेत.

एका महिन्यात सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यात, या रस्त्याच्या कामामुळे रिक्षा चालकांना मोठा वळसा घेऊन ठाणे स्थानक गाठावे लागत आहे. यामध्ये त्यांचा अधिकचा वेळ आणि इंधन खर्च होत असल्यामुळे शेअरिंग भाडे दरात वाढ करण्यात आली आहे. सावरकरनगर रस्ता वाहतूकीसाठी खुला होताच हे दर पुन्हा पूर्वरत करण्यात येतील.

– विनायक सुर्वे, अध्यक्ष, एकता रिक्षा टॅक्सीचालक-मालक संघटना, ठाणे.

ठाण्यातील सावरकरनगर येथे सुरू झालेल्या रस्त्याच्या कामामुळे रिक्षा चालकांनी स्वयंघोषित दरवाढ केली आहे. यशोधननगर ते ठाणे स्थानक या मार्गावर शेअरिंग रिक्षाचालक प्रतिप्रवासी २० रुपये आकारत होते. सध्या प्रतिप्रवासी २५ रुपये आकारले जात आहेत.