scorecardresearch

बदलापूर : वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी फर्क अभियान; वन्यजीवांचे रस्त्यांवरील अपघात क्षेत्र शोधण्याची मोहिम

नोटकॉम या किंवा यासारख्या अन्य मोबाईल ऍपच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या अपघाताचे फोटो काढून ते संकलित केले जाणार आहेत.

wildlife road accident spot
(संग्रहित छायाचित्र) फोटो- इंडियन एक्स्प्रेस(file photo)

देशभरात सुरू असलेल्या महामार्ग निर्मितीच्या कामांना वेग येत असताना यात वन्यजीवांच्या मार्गांवर अतिक्रमण केले जात असल्याची ओरड होते आहे. वन्यजीवांचे मार्ग निश्चित करून त्यांना भुयारी मार्ग किंवा उड्डाणमार्ग तयार करण्याची गरज असून त्यासाठी वन्यजीवांच्या अपघातांच्या जागा निश्चित करण्यासाठी कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर नुकतेच फर्क (FARK) नावाचे अभियान सुरू करण्यात आले आहे. यात विशिष्ट मोबाईल ऍपच्या मदतीने वन्यजीवांच्या अपघाताची नोंद ठेवली जाणार आहे.

हेही वाचा >>> शासकीय निधीच्या प्रतीक्षेत ठाणे, कल्याण-डोंबिवली पालिकेचे अर्थसंकल्प?

ज्या भागात वन्यजीवांचे नैसर्गिक मार्ग आहेत त्या भागातून एखादा महामार्ग उभारला जात असताना वन्यजीवांचे मार्ग बंद होतात. अशावेळी वन्यजीवांचा अपघाताता मृत्यू झाल्याच्या घटना समोर येतात. वन्यजीवांचे अपघात होत असलेल्या ठिकाणी रस्ते रूंदीकरण करत असताना त्यांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी मार्ग उभारण्याची गरज आहे. राज्यातल्या मुंबई नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्ध महामार्गात असा प्रयोग करण्यात आला. मात्र इतर ठिकाणी तसे प्रयोग अजुनही झालेले नाही. या प्रयोगांसाठी वन विभागाकडे अशा अपघातांची किंवा वन्यजीवांच्या नैसर्गिक मार्गांची माहिती असणे आवश्यक असते. अनेकदा ही माहिती उपलब्ध नसल्याने महामार्ग उभारणी किंवा रस्ते रूंदीकरण करत असताना अशा गोष्टींकडे कानाडोळा करून वन विभाग ना हरकत प्रमाणपत्र देऊन रस्ते उभारणीचा मार्ग मोकळा करत असते.

हेही वाचा >>> शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांना धक्का, डोंबिवलीतील दत्तनगरमधील ९० अपात्र लाभार्थींना ‘झोपू’ योजनेत घरे देण्याचा विषय स्थगित

वन्यजीवांच्या अपघाताची नोंद होत नसल्याने त्यांचे मार्ग बंद होऊन त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वन्यजीवांच्या मार्गांचा आणि अपघात स्थळांचा अभ्यास करण्याची फर्क (FARK) ही अनोखी मोहिम कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील पाच वनक्षेत्रांमध्ये हाती घेण्यात आली आहे. अश्वमेध प्रतिष्ठान आणि इंटॅक ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान सुरू करण्यात आले असून मनुसृष्टी फाऊंडेशनच्या मदतीने या माहितीची मांडणी केली जाणार आहे. या नोंदींचे शास्त्रीय विश्लेषण करण्याची जबाबदारी डेहराडूनच्या वाइल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे कार्यरत असणाऱ्या संशोधिका मैत्रेयी विश्वास भावे यांनी घेतलेली आहे, अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे. महामार्गांवर वन्यजीवांसाठी स्वतंत्र मार्ग असणे गरजेचे आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्य मिळवले जात असून वन विभाग यात सहकार्य करत असल्याचे हरड यांनी सांगितले आहे. फर्क मोहिमेमुळे वन्यजीवांच्या आयुष्यात फरक पडण्याची आशा आहे, असेही हरड म्हणाले.

अशी होणार नोंद

नोटकॉम या किंवा यासारख्या अन्य मोबाईल ऍपच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या अपघाताचे फोटो काढून ते संकलित केले जाणार आहेत. यात ठिकाण, वेळ आणि भौगोलिक नोंद होते. ही नोंद वन विभागाकडेही होत असते. मात्र त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न या मोहितमेतून केला जाणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 14:44 IST