scorecardresearch

रस्ते बाधित शेतकऱ्यांच्या ११ कोटीच्या भरपाईवर डल्ला, भिवंडी जवळील नंदिठणे गावातील घटना

शासनाकडून मूळ शेतकऱ्यांना मिळणारी ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रूपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन शेतकऱ्यांबरोबर, शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

कल्याण- मुंबई-बडोदा महामार्गात जमीन गेलेल्या भिवंडी जवळील नंदिठणे गावातील आठ शेतकऱ्यांची अनोळखी व्यक्तिंनी बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे शासनाकडून मूळ शेतकऱ्यांना मिळणारी ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रूपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन शेतकऱ्यांबरोबर, शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील अवल कारकुल संजय गाढवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभावती भोईर, मनीषा वैती, विदुला दळवी, लिना विंचुरकर, सुवर्णा पाटील, विनीत भोईर, अमोल भोईर, हरेश भोईर अशी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, नंदिठणे गावातील मूूळ जमीन मालक नारायण रामजी भोईर यांची एकूण आठ सर्व्हे क्रमांकामध्ये एकूण १७ हजार ८२४ चौरस मीटर जमीन आहे. ही जमीन मुंबई-बडोदा महामार्गासाठी लागणार असल्याने शासनाने अधिग्रहित केली आहे. नारायण भोईर मयत असल्याने त्यांच्या नऊ वारसांच्या नावे अधिग्रहित जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळणार होता.

दरम्यानच्या काळात या जमिनीचे कुलमुखत्याधारक आपण आहोत. सर्व शासकीय नोंदणीची कागदपत्रे नरेंद्र नारायण भोईर यांनी आपल्या भावंडांच्या दस्तऐवजासह महसूल कायार्लयात जमा केली. त्या कागदपत्रांच्या आधारे उपविभागीय कार्यालयाने जमीन अधिग्रहणाची ११ कोटी ६४ लाखाची रक्कम नरेंद्र भोईर यांच्या बँक खात्यात गेल्या वर्षी जमा केली.

गेल्या आठवड्यात विनीत भोईर, अमोल भोईर आणि हरेश भोईर हे ठाणे पाचपाखाडी येथे राहणारे बंधू भिवंडी उपविभागीय कार्यालयात आले. त्यांनी नंदिठणे येथील नारायण भोईर यांचे वारस आपण आहोत. जमीन अधिग्रहणाचा मोबदला आम्हाला द्यावा म्हणून अर्ज दिला. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता मूळ मालक हे तीन बंधू असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. नंदिठणे येथील आठ मूळ जमीन मालकांच्या नावाचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून त्या आधारे भिवंडीतील दस्त नोंदणी कार्यालयात बनावट दस्त, खोट्या स्वाक्षऱ्या मारून नारायण भोईर यांच्या जमिनीचा मोबादला अज्ञात व्यक्तिंनी काढून घेऊन शासनाची फसवणूक केली म्हणून अवल कारकून संजय गाढवे यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farmers affected by road projects cheated by unknown people asj