आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा शहापूर जवळील मुंबई-नाशिक महामार्गावरील वासिंद गावाजवळ मुक्कामी आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या बहुतांशी मागण्यांवर सकारात्मकता दाखविली असली तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय विधीमंडळात मांडून त्याचे लेखी आदेश तातडीने काढून ते जिल्हाधिकारी, तहसीलदारांमार्फत गाव पातळीवर गेले पाहिजेत, तरच आम्ही माघारी जाऊ, अन्यथा आमचा मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्धार कायम आहे, असे मोर्चेकरांनी सांगितले.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये फेरीवाल्याला लुटणारा तोतया पोलीस अटकेत
शेती उत्पादित मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, सात बारा उतारा कोरा, नुकसानी नंतर शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मिळाला पाहिजे, अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन त्याची भरपाई मिळाली पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा विराट मोर्चा नाशिकहून मुंबईत निघाला आहे.
या मोर्चेकरांची दोन दिवसापूर्वी कृषीमंत्री दादा भुसे यांनी शहापूर येथे भेट घेऊन चर्चा केली. आम्हाला थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून चर्चा करायची आहे. ही मोर्चेकरांची मागणी आहे. मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहेत. ते शेतकऱ्यांंच्या मागण्यांचा विषय विधीमंडळात मांडतील, असे आश्वासन सरकारतर्फे मंत्री भुसे यांनी दिले आहे. त्यानंतर शेतकरी मागण्यांचे लेखी आदेश जिल्हाधिकारी, तहसीलदार, गाव पातळीवर तातडीने जाऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. ही मागणी येत्या तीन दिवसात मान्य करावी. तोपर्यंत आम्ही वासिंद येथे मुक्काम करतो. लेखी आदेश निघून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गावपातळीवर गेले की आम्ही माघारी जातो, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
हेही वाचा >>>करोना चाचण्या वाढविण्याबरोबरच उपाययोजना करा; ठाणे महापालिका आयुक्तांच्या आरोग्य विभागाला बैठकीत सूचना
शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करुन त्यांना मुंबईच्या दिशेने येऊच नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शेतकरी मोर्चात शहापूर, कल्याण, मुरबाड परिसरातील स्थानिक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्या या आमच्याच मागण्या आहेत. त्या मान्य झाल्याच पाहिजेत, याविषयी स्थानिक शेतकरी आग्रही आहेत, असे शेतकरी संघर्ष संघटनेचे कल्याण तालुक्यातील कोकण विभाग अध्यक्ष चंद्रकांत भोईर यांनी सांगितले. वासिंद भागातील शेतकरी मोर्चात कल्याण तालुक्यातील शेतकरी संघर्ष संघटनेचे सदस्य विनेश पाटील, मोरेश्वर पाटील, मनोज मोगरे, जाॅन पाटील सहभागी झाले आहेत.
वर्षानुवर्ष वर्ष आमच्या मागण्या आम्ही सरकारकडे करतो. आश्वासन देण्या पलिककडे काहीही होत नाही. त्यामुळे यावेळी आम्ही आमची महत्वाची शेतीची कामे, मजुरी सोडून मोर्चात सहभागी झालो आहोत, असे मोर्चातील महिलांनी सांगितले.