जिल्ह्यातील गृहसंकुलांसह महाविद्यालय, शाळा, कार्यालयांनाही सुविधा पुरवणार

ठाणे : ग्राहक आणि शेतकरी यांच्यादरम्यानची विपणनातील दलालांची साखळी मोडीत काढण्यासाठी आठवडी बाजारसारख्या संकल्पना यशस्वी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना शेतमाल घरपोच पुरवण्याची सुविधा ठाणे जिल्ह्यात सुरू होत आहे. विकेल ते पिकेल याअंतर्गत विविध शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, प्रक्रिया उद्योग यांच्यामार्फत शेतमालाची शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील गृहसंकुले, उपाहारगृह, वसतिगृह, पेट्रोल पंप, निवारागृह, शासकीय कार्यालय आणि वसाहती, खासगी कार्यालयाच्या वसाहती, निवासी आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालय, मंडई, मॉल यांचे सर्वेक्षण करून नोंदणी सुरू करण्याचे काम जिल्हा कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. 

याबाबत राज्य शासनाने नुकत्याच नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे शेतमाल विपणन व्यवस्थेतील दलालांची साखळी तुटणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य तो भाव मिळण्यास मदत होणार आहे.

शेतमालाला रास्त भाव आणि ग्राहकांना उत्तम दर्जाची फळे, भाजीपाला मिळावा याकरिता विकेल ते पिकेल आणि संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. याचीच पुढील पायरी म्हणुन ग्राहकांना घरपोच शेतमाल देण्याची सुविधा राज्य कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. दलाल आणि व्यापारी हे शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात शेतमालाची खरेदी करून ग्राहकांना चढय़ा दराने विकतात. यामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, प्रक्रिया उद्योग यांच्यामार्फत शेतमालाची शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शंभर किंवा त्यापेक्षा अधिक सभासद असलेली गृहसंकुले, उपाहारगृह, वसतिगृह, पेट्रोल पंप, निवारागृह, शासकीय कार्यालय, शासकीय वसाहती, खासगी कार्यालयाच्या वसाहती, निवासी शाळा, महाविद्यालय, माध्यमिक शाळा, मंडई, मॉल यांचे सर्वेक्षण करून नोंदणी करण्याचे काम जिल्हा कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा कृषी विभागातर्फे ३० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थांच्या मागणीनुसार शेतमालाची गरज निश्चित करून पुरवठा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडय़ानुसार नागरिकांना दररोज थेट घरपोच शेतमालाची विक्री केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन यंत्रणा उभारणी विचाराधीन असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

सुविधेचे वेगळे फायदे काय?

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काही फळांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यात केळी, कोकणातील हापूस, नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष यांसारखी विविध फळेदेखील नागरिकांना हंगामात घरपोच मागवता येणार आहे. तसेच याद्वारे नागरिकांना दुध, तूप यांसारख्या गोष्टीही मागवता येणार आहेत.

नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील गृहसंकुले, कार्यालय, शाळा, महाविद्यालयांचे सर्वेक्षण आणि नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणाकरिता येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.  – मोहन वाघ, कृषी अधिकारी, ठाणे