scorecardresearch

२७ गावांच्या नगरपालिकेसाठी जोरदार हालचाली

डोंबिवलीलगत असलेल्या असलेल्या २७ गावांची नगरपालिका करण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा जोर चढला आहे.

KDMC
कल्याण डोंबिवली महापालिका

शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न; भाजपचेही संख्याबळ घटणार; नेत्यांमध्ये अस्वस्थता
डोंबिवलीलगत असलेल्या असलेल्या २७ गावांची नगरपालिका करण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा जोर चढला आहे. या गावांची नगरपालिका करण्याविषयी शासन ठाम आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या गावांची नगरपालिका स्थापन करताना कोणत्याही भौगोलिक, विकासकामांच्या अडचणी उभ्या राहू नयेत यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. शिवसेनेला शह देण्याचा हा जोरदार प्रयत्न असला तरी भाजप आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या आघाडीला या गावांमधून तब्बल १२ जागांवर पाणी सोडावे लागणार असल्याने गोटात अस्वस्थता पसरली आहे.
२७ गावांची नगरपालिका करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने या गावांची नवीन विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. या गावांच्या हद्दीची तसेच चतु:सीमेची मोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात २७ गावांमध्ये विकासकामे करताना अडचणी येणार नाहीत, असा शासनाचा विचार असल्याची माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणूक काळात २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून येथील ग्रामस्थांनी भाजप आणि संघर्ष २७ गावच्या ग्रामस्थांनी महापालिका निवडणुकीत संघर्ष समितीचे ११ नगरसेवक निवडून पाठविले. संघर्ष समितीने गावांमधील आपले अस्तित्व मुख्यमंत्र्यांना सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे समितीसह २७ गावच्या ग्रामस्थांना नाराज न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या गावांची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याचा आराखडा तयार करायचा आणि योग्य वेळी गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वेगळी करायची, अशी व्यूहरचना शासन पातळीवर आखण्यास सुरुवात झाली आहे.
भाजप चिंतेत
महापालिका निवडणुकीत शिवसेना नेत्यांकडून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर टीकेचे प्रहार करण्यात आले. महापालिकेत सत्ता स्थापनेवेळी भाजपसोबत जायचे नाही, असा शिवसेनेत मतप्रवाह होता. त्यामुळे भाजप महापालिकेतील सत्तेत सहभागी असला तरी मनाने तो शिवसेनेसोबत नाही. गावांची स्वतंत्र नगरपालिका करून शिवसेनेचे उट्टे काढायचे बेत भाजपच्या गोटात आखले जात आहेत. मात्र असे झाल्यास संख्याबळ कमी होणार असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते चिंतेत आहेत.

संघर्ष समितीने पराभव झाल्याचे मानू नये. स्वराज्य मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या तहावर महाराजांनी चतुराईने स्वाक्षऱ्या केल्या होत्या. क्रिकेटच्या मैदानावर चेंडू टाकताना वेगवान गोलंदाज २५ पावले मागे जातो आणि फलंदाजाची दांडी उडवितो. हे वास्तव आहे. संघर्ष समितीचे २७ गावांचे स्वप्न लवकरच यशस्वी होईल आणि नगरपालिका होऊ नये यासाठी प्रयत्नशील असलेल्या विरोधकांची दांडी उडेल.
-कपील पाटील, खासदार, कल्याण

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2015 at 02:53 IST
ताज्या बातम्या