नामवंतांचे बुकशेल्फ : संवेदनशील दृष्टी मिळाली

ररोज शाळेत एक तास ते मुलांना पुस्तके वाचायला लावत. त्यातून वाचनाची आवड जोपासत गेली.

फादर हिलरी फर्नाडिस

उत्तन येथील वेलंकनी चर्चचे तीर्थाचार्य फादर हिलरी फर्नाडिस यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढा अभ्यास केला आहे. विविध प्रकारच्या वाचनामुळे धर्म-जातिभेदाच्या पलीकडे बघण्याची संवेदनशील दृष्टी मिळाल्याचे ते सांगतात.

माझा जन्म वसई तालुक्यातील तर्खड गावचा. आसपास मराठी आणि विशेषत: हिंदू वातावरण. याच वातावरणात लहानाचा मोठा झालो. शालेय जीवनात वाचनाची आवड निर्माण झाली ती म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक वाझ मास्तर यांच्यामुळे. वाझ हे मूळचे पुण्याचे. त्यांचे वाचन दांडगे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही वाचले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. दररोज शाळेत एक तास ते मुलांना पुस्तके वाचायला लावत. त्यातून वाचनाची आवड जोपासत गेली. ही आवड इतकी वाढली की रस्त्याने जाता जाता चणे-शेंगदाण्याच्या पुडीसाठी वापरलेल्या कागदावरचेदेखील वाचून काढत असे. त्या वेळी साने गुरुजींनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचली. श्यामची आई, धडपडणारी मुले ही पुस्तके वाचून मी भावुक होऊन जायचो. यातूनच संवेदनशीलता निर्माण झाली. आज धर्मगुरू म्हणून काम करताना ही संवेदनशीलता फार उपयोगी पडते.

महाविद्यालयीन जीवनात वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, पु. भा. भावे, अरविंद गोखले यांच्या साहित्याचे विपुल वाचन केले. हळूहळू काव्यवाचन आणि समीक्षणात्मक वाचनाकडे माझा ओढा वाढू लागला. केशवसुत, बालकवी, कुसुमाग्रज यांच्या कवितांसोबतच मराठी वाङ्मयाचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाचा अभ्यास केला. पुढे धर्मगुरू होण्यासाठी गेलो असतानाही हे वाचन सुरूच होते. मराठीवर माझा विशेष भर होता. मराठी मातीत, मराठी संस्कृतीत जन्मलो, वाढलो. याच वेळी भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. उपनिषदे आणि हिंदू धर्म यांचा अभ्यास केला. चार वर्षे सातत्याने त्यावरचे वाचन केले. त्यातून एक शिकायला मिळाले ते म्हणजे संस्कृती ही धर्मविरहित असते. या वाचनातूनच धर्म, जात या भेदाच्या भिंतीपलीकडे जाऊन विचार करण्याची सवय लागली. महाराष्ट्र पत्रिका, ललित या अंकांचे वाचन केले. ललितमुळे मी साहित्यात होणाऱ्या घडामोडींशी आजही जोडला गेलो आहे. तुकारामाची गाथा, नामदेव, दासबोध, महाभारत, रामायण आदी ग्रंथांसोबतच विवेकानंदांचे दहा खंडही वाचून काढले आहेत.

याच विचारातून मी अनेक भजने आणि कीर्तने लिहिली आणि ती सादरही केली. वसईतून आज नियमित प्रकाशित होणाऱ्या ‘सुवार्ता’ मासिकापासून लेखनाला सुरुवात झाली. तात्त्विक लेख आणि कथा मोठय़ा प्रमाणावर लिहिल्या. जनपरिवारमध्येही लिखाण सुरू असते. आजपर्यंत साडेपाचशे लेख लिहिले आहेत. सध्या ओशोचो ध्यानसूत्र आणि भालचंद्र नेमाडे यांचे हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ यांचे वाचन सुरू आहे तसेच ख्रिस्त गीतगाथा हे येशू ख्रिस्ताचे काव्यात्मक चरित्र लिहिण्याचे काम सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Father hillary fernandes bookshelf