scorecardresearch

ठाणे: वेळेत नाश्ता दिला नाही म्हणून नातवंडांसमोर सुनेची गोळी झाडून हत्या, फरार सासऱ्याचा शोध सुरु

नाश्ता दिला नाही म्हणून सुनेची गोळी झाडून हत्या, दुसरी गोळी झाडणार इतक्या मोलकरणीने रोखलं अन्…

नाश्ता दिला नाही म्हणून संतापलेल्या वृद्ध सासऱ्याने बंदुकीतून गोळी झाडून सुनेची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील राबोडी भागात गुरूवारी सकाळी हा प्रकार घडला असून या घटनेनंतर फरार झालेल्या सासऱ्याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. हा वृद्ध बांधकाम व्यावसायिक असल्याचे पोलिसांकडून समजते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सीमा राजेंद्र पाटील असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर, काशिनाथ पाटील (७६) असे आरोपीचे नाव आहे. काशीनाथ पाटील हे राबोडी भागातील एका उच्चभ्रू इमारतीमध्ये राहतात. त्यांच्यासोबत पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडेही राहतात. काशीनाथ यांचे त्यांची पत्नी आणि दोन्ही सुनांसोबत जेवण तसेच इतर कारणांवरून सातत्याने खटके उडत असायचे.

गुरुवारी सकाळी नाश्ता दिला नाही म्हणून त्यांचा सीमा (सून ) हिच्यासोबत वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या काशीनाथ याने सीमावर बंदुकीतून गोळी झाडली. यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर घरातील मोलकरणीने काशीनाथ यांना दुसऱी गोळी झाडण्यापासून रोखले. हा प्रकार घडला त्यावेळेस घरामध्ये त्यांची पत्नी, दुसरी सून, नातवंडे आणि मोलकरीण होती.

जखमी झालेल्या सीमा यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळी झाडल्याच्या घटनेनंतर काशीनाथ हे फरार झाले. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस काशीनाथ यांचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father in law killed daughter in law over breakfast in thane sgy

ताज्या बातम्या